
सत्ताधारी भाजपने हिंदुस्थानातील संस्थात्मक व्यवस्थेवर कब्जा केला आहे. वित्तीय संस्था, मीडियावरही भाजपचे नियंत्रण आहे. त्यामुळे या संस्थांनी निष्पक्षपणे राजकीय लढाईचे समर्थन केले पाहिजे. परंतु ते आता होत नाही, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मांडली आहे.
अमेरिकेचे माजी राजदूत आणि हार्वर्ड स्कूलचे प्राध्यापक निकोलस बर्न्स यांच्यासोबत राहुल गांधी यांनी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी हार्वर्डच्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. त्यावेळी त्यांनी भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधत टीकेची झोड उठवली.
मी पंतप्रधान असतो तर…
मी पंतप्रधान असतो तर प्राधान्याने रोजगार निर्मितीवर जास्त लक्ष दिले असते. विकास हवा आहे; पण निर्मिती आणि रोजगार उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे, असे राहुल गांधी म्हणाले. सध्या देशात विकासातून रोजगार निर्मिती होताना दिसत नाही, असे ते म्हणाले.




























































