
राज्यातील नाराज काँग्रेसचे आमदार नवी दिल्लीत जाऊन थेट हायकमांडकडे जाऊन काँग्रेसच्याच मंत्र्यांच्या विरोधात तक्रार करणार असल्याचे वृत्त आहे. या आमदारांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली असल्याचे सांगण्यात येते.
राज्यातील सात ते आठ काँग्रेसचे आमदार नवी दिल्लीत जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येते. मात्र हा आकडा पुढील काही दिवसांत वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील आमदारांचा समावेश आहे. नवी दिल्लीत हे आमदार काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेणार आहेत. त्यांच्यामार्फत या आमदारांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट मागितली आहे.
तीन मंत्री नवी दिल्लीत दाखल
येत्या 4 व 5 एप्रिल रोजी महाराष्ट्रासह इतर राज्यांतील काँग्रेसचे आमदार नवी दिल्लीत हायकमांडच्या भेटीला जाणार आहेत. त्यावेळी या आमदारांनी ही भेट मागितल्याचे सांगण्यात येते. मात्र राज्यातील या आमदारांनी नवी दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठाची भेट घेण्यापूर्वी राज्यातील दोन-तीन मंत्री नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. विदर्भातील एक ज्येष्ठ मंत्री दुपारी दिल्लीत दाखल झाले. त्यापाठोपाठ अजून एक-दोन मंत्री दिल्लीत दाखल होणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र या घडामोडींमुळे काँग्रेसमध्ये चर्चेला उधाण आले आहे.



























































