काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

काँग्रेसचे चंद्रपूर येथील खासदार बाळू ऊर्फ सुरेश धानोरकर (47) यांचे मंगळवारी निधन झाले. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वरोरा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर व दोन मुले असा परिवार आहे. बाळू धानोरकर हे काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार होते.

काही दिवसांपासून बाळू धानोरकर यांची प्रकृती खालावली होती. नागपूर येथे त्यांच्यावर किडनी स्टोनची शस्त्र्ाक्रिया करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर प्रकृती अधिक गंभीर झाल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना चंद्रपूर येथून एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीला मेदांता रुग्णालयात हलविण्यात आले होते. आज मंगळवारी पहाटे 3.30 वाजता उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. एअर अॅम्ब्युलन्सने त्यांचे पार्थिव वरोरा येथे आणण्यात आले. सायंकाळी वरोरा येथील वणी रस्त्यावर असलेल्या स्मशानभूमीत खासदार धानोरकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

27 मे रोजी बाळू धानोरकर यांचे वडील नारायणराव यांचे निधन झाले. मात्र, आजारपणामुळे ते वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहू शकले नाहीत. 1975 मध्ये जन्मलेल्या सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदारसंघातून विजय मिळविला होता. भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच तत्कालीन पेंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा त्यांनी पराभव केला होता. महाराष्ट्रातील काँग्रेसचे ते एकमेव खासदार होते.