नांदेड येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांचे हैदराबादेतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी पहाटे निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. खासदार चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त येताच नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली. नायगाव येथे मंगळवारी सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दोन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत वसंतराव चव्हाण यांनी दणदणीत विजय मिळवला. प्रचाराची धामधूम सुरू असतानाच वसंतरावांची प्रकृती बिघडली होती. काही दिवसांपासून त्यांना सातत्याने डायलिसिस करावे लागत होते. 14 ऑगस्ट रोजी प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने हैदराबादेतील कीम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन भाऊ असा परिवार आहे. खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिवावर मंगळवारी नायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अल्पपरिचय
वसंतराव चव्हाण यांचे वडील बळवंतराव हे माजी आमदार. लोकसेवेचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. अफाट लोकसंपर्क हे वसंतरावांचे वैशिष्ट्य. १९७८ मध्ये नायगावच्या सरपंचपदापासून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. सलग 24 वर्षे वसंतराव नायगावचे सरपंच होते. त्यानंतर दोन वेळा जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून आले. विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. २००२ मध्ये राज्यपाल कोट्यातून त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आले. २००९ मध्ये नायगाव मतदारसंघातून ते अपक्ष म्हणून विधानसभेवर निवडून आले. बाजार समिती, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. नायगाव परिसरात त्यांनी शैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे उभारले.
काँग्रेस विचारधारेला पुढे नेले
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. जमिनीशी घट्ट जुळून असलेल्या या लोकप्रिय नेत्याने नेहमी काँग्रेसच्या विचारधारेला पुढे नेण्याचे प्रामाणिक कार्य केले, अशा शब्दांत काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली.
विनम्र नेतृत्व हरपले
नांदेडच्या जनतेशी थेट संपर्क ठेवणारे विनम्र आणि अनुभवी नेतृत्व आज हरपले. राजकारण व सहकार क्षेत्रात वसंतराव चव्हाण यांचे काम लक्ष वेधणारे आहे. जनकल्याणासाठी त्यांनी केलेला राजकीय प्रवास लक्षणीय असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.