नांदेड येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांचे हैदराबादेतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी पहाटे निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. खासदार चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त येताच नांदेड जिल्हय़ावर शोककळा पसरली. नायगाव येथे मंगळवारी सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दोन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत वसंतराव चव्हाण यांनी दणदणीत विजय मिळवला. प्रचाराची धामधूम सुरू असतानाच वसंतरावांची प्रकृती बिघडली होती. काही दिवसांपासून त्यांना सातत्याने डायलिसिस करावे लागत होते. 14 ऑगस्ट रोजी प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने हैदराबादेतील कीम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन भाऊ असा परिवार आहे. खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिवावर मंगळवारी नायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अल्पपरिचय
वसंतराव चव्हाण यांचे वडील बळवंतराव हे माजी आमदार. लोकसेवेचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. अफाट लोकसंपर्क हे वसंतरावांचे वैशिष्टय़. 1978 मध्ये नायगावच्या सरपंचपदापासून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. सलग 24 वर्षे वसंतराव नायगावचे सरपंच होते. त्यानंतर दोन वेळा जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून आले. विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. 2002 मध्ये राज्यपाल कोटय़ातून त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आले. 2009 मध्ये नायगाव मतदारसंघातून ते अपक्ष म्हणून विधानसभेवर निवडून आले.