
सामना प्रतिनिधी । हिंगोली
हिंगोली जिल्हा काँग्रेस समितीच्या आज झालेल्या आढावा बैठकीमध्ये राष्ट्रवादीकडे असलेला वसमत विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्यावा, अशी मागणी वसमत येथील डॉ. मारोती क्यातमवार व अन्य पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच वसमतमधुन चार जण इच्छुक असल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, काँग्रेसच्या आमदारांनी पंधरा वर्ष प्रतिनिधीत्व केलेल्या हिंगोली विधानसभा क्षेत्राच्या जागेवर राष्ट्रवादीने दावा केलेला असतांनाच राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या वसमत या होम टाऊनच्या जागेवर दावा करत काँग्रेसनेही लढण्याची तयारी दाखविली आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघातील पराभवाच्या नंतर तब्बल महिनाभराने काँग्रेस पक्षाची जिल्हा आढावा बैठक जिल्हा काँग्रेस समिती व गुजरातचे पक्षप्रभारी राजीव सातव यांच्या संपर्क कार्यालयात 30 जुन रोजी आमदार डॉ. संतोष टारफे व जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घेण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने इच्छुकांनी प्रदेश काँग्रेस समितीकडे अर्ज द्यावेत, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. राज्य पातळीवर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांमध्ये जागा वाटपासंबंधी चर्चेची प्राथमिक फेरी पूर्ण झालेली असतांनाच हिंगोली जिल्ह्यात मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाकडुन त्यांच्या ताब्यातील हिंगोली व वसमतच्या जागेसंदर्भात मागणी पुढे केली जात आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी 10 वर्ष वसमतचे प्रतिनिधीत्व आमदार म्हणुन केले आहे. काँग्रेसने काढलेल्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या वेळी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडुन जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. वसमतमध्ये काँग्रेसची ताकद असल्याचा संदेश संघर्ष यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादीला देण्यात स्थानिक पदाधिकारी यशस्वी झाले होते. दरम्यान, रविवारी झालेल्या जिल्हा काँग्रेसच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीकडील वसमत विधानसभा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडवुन घ्यावा, अशी मागणी डॉ. मारोती क्यातमवार व पदाधिकाऱ्यांनी केली.
वसमतमधुन माजी नगराध्यक्ष अब्दुल हाफीज यांनी २०१४ ला आघाडीत बिघाडी झाल्यावर काँग्रेसकडुन निवडणुक लढवत लक्षवेधी मते खेचली होती. हाफीज यांच्यासह डॉ. क्यातमवार, राजाराम खराटे, प्रिती जयस्वाल या इच्छुकांची नावे समोर आल्याचे सुत्रांनी सांगितले.
























































