‘हात’तिच्या…उमेदवाराचा नाही पत्ता, तरीही पुण्यात काँग्रेसचा प्रचार सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पुणे

राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून विविध पक्षांचे बहुतेक जागांवरचे उमेदवारही जाहीर झाले आहेत. मात्र पुणे लोकसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत आली तरीही उमेदवाराचा पत्ता नाही. उमेदवार ठरण्याआधीच काँग्रेसतर्फे इच्छुक उमेदवारांसोबत आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ वाढविण्यात आला. त्यानंतर आघाडीतर्फे शहराच्या मध्य वस्तीत पदयात्राही काढण्यात आली.

राज्यात शिवसेना-भाजपसह मित्रपक्षांची महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या महाआघाडीने बहुतेक जागांवरील उमेदवाराच्या नावाची घोषणा झाली. त्यामुळे त्यांच्या प्रचारालाही सुरुवात झाली आहे तर महायुतीकडून पुण्याच्या जागेसाठी आठ दिवसांपूर्वीच पालक मंत्री गिरीश बापट यांच्या नावाची घोषणा झाली. त्यानुसार महायुतीचा पुण्यात जोरदार प्रचारही सुरू झाला आहे. दुसरीकडे आघाडीचा उमेदवार अद्याप निश्चित होत नाही. उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच आघाडीने रविवारी कसबा गणपतीचे दर्शन घेत प्रचाराला सुरुवात केली. या वेळी काँग्रेसतर्फे लोकसभेसाठी इच्छुक अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, ऍड. अभय छाजेड, प्रवीण गायकवाड उपस्थित होते.

वसंतदादांचे घराणे ‘हाता’शिवाय लढणार
सांगली हा वसंतदादा पाटील यांचाच हे महाराष्ट्रातील प्रत्येकाला ठाऊक आहे. गेली 40 वर्षे सांगली, काँग्रेस आणि दादा हे गणित अगदी फिट्ट बसले होते, पण यंदा मात्र या गणिताची एक पायरी चुकली आहे. 40 वर्षांत पहिल्यांदाच वसंतदादांच्या घराण्यातील उमेदवार ‘हात’ या चिन्हाशिवाय लोकसभा लढणार आहे. दादांचा नातू विशाल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ‘बॅट’ घेऊन मैदानात उतरला आहे. 1980 मध्ये खुद्द वसंतदादा या मतदारसंघातून लोकसभेवर गेले. त्यांच्या पश्चात चिरंजीव प्रकाशबापू, नंतर मदन पाटील, प्रतीक पाटील हे काँग्रेसचा ‘हात’ धरून दिल्लीत गेले. 2014 मध्ये मात्र ही परंपरा खंडित झाली. आता दादांचा नातू विशाल पाटील ‘बॅट’ घेऊन उतरला आहे.