आरंभ है प्रचण्ड, बोले मस्तकों के झुण्ड! लोकसभेसाठी काँग्रेसने केला शंखनाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात काँग्रेसने मारलेली जबरदस्त मुसंडी पाहून भल्या भल्या चाणक्यांचे डोके गरगरून गेले आहे. काँग्रेसच्या विजयाची पाळेमुळे खोदण्यात येत आहेत. त्याची कारणे शोधली जात असतानाच काँग्रेसने लोकसभेसाठी शंखनाद केला आहे. काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडीओत ही रणभेरी वाजवण्यात आली आहे.

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर आज अचानक एक व्हिडीओ अपलोड झाला. ‘आरंभ है प्रचण्ड, बोले मस्तकों के झुण्ड…’ असे दोन मिनिटांचे गाणे असलेल्या या गाण्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या राजस्थान, छत्तीसगड तसेच मध्य प्रदेशातील सभा, त्यांनी शेतकऱ्यांशी साधलेला संवाद, भाजपच्या राज्यातील अनाचार अशा सर्व गोष्टींचे अत्यंत प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. या व्हिडीओसोबतच ‘जनता की पुकार है, अब हमारी सरकार है.. प्रचण्ड जीत का यह शंखनाद है…’ असा संदेशही देण्यात आला आहे.

राजस्थान, छत्तीसगड व मध्य प्रदेशातील विजयाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. हाच उत्साह कायम ठेवण्यासाठी काँग्रेसने आपल्या नव्या व्हिडीओमधून लोकसभेची रणदुदुंभी वाजवली.

कौरवों की भीड हो या पांडवों की नीड हो
जो लड सका है वो ही तो महान है…
2009 मध्ये अनुराग कश्यप यांचा ‘गुलाल’ हा सिनेमा आला होता. बिहारच्या राजकारणावर, तेथील जातीपातीच्या तान्याबान्यावर, विशेषतः राजपूत राजकारणावर भाष्य करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला, मात्र या चित्रपटात पीयूष मिश्रा यांनी लिहिलेले एक गाणे प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिले. ‘आरंभ है प्रचण्ड, बोले मस्तकों के झुण्ड…’ हेच ते गाणे. अत्यंत प्रभावी शब्दरचना, शब्दाशब्दात अंगार रसरसलेला. व्यवस्थेच्या विरोधात लढण्याचे आत्मभान देणारे हे गाणे… काँग्रेसने या गाण्यातला नेमका गाभा उचलला.

आन बान शान या कि जान का हो दान
आज इक धनुष के बाण पे उतार दो…
आपला गौरव, आपली प्रतिष्ठा, मानसन्मान, एवढेच काय प्राणही द्यावा लागला तरी चालेल, पण प्रत्यंचा ताणलेली आहे, बाण सुटणार आहे त्यावरच लक्ष केंद्रित करा…

जिस कवि की कल्पना में जिन्दगी हो प्रेम गीत
उस कवि को आज तुम नकार दो
भीगती मसें में आज फूलती रगों में आज
आग की लपट का तुम बघार दो
मुजोर व्यवस्थेच्या विरोधात लढण्यासाठी वन्ही तो चेतवावा… असा संदेश देणारे हे गाणे आता काँग्रेसचे स्फूर्तिगान असणार आहे.