बिहार विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली, जेष्ठ नेत्यांच्या समित्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तोंडावर आलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला सत्तेवर आणण्यासाठी काँग्रेसनेही कंबर कसली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य काँग्रेस नेते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरणार आहेत. नवी दिल्लीत बिहार निवडणुकीसाठीच्या काँग्रेसच्या विविध समित्यांची घोषणा झाली. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला हे काँग्रेसच्या निवडणूक व्यवस्थापन आणि समन्वय समितीचे सरचिटणीसपदी असतील.समन्वय समितीत अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत राजदच्या नेतृत्वाखालील महाआघाडीतून काँग्रेस  243 पैकी 70 जागा लढवत आहे. बिहार निवडणूक प्रचारासाठीच्या  14 सदस्यीय  निवडणूक व्यवस्थापन आणि समन्वय समितीचे समन्वयक म्हणून मोहन प्रकाश धुरा सांभाळणार आहेत.या समितीत वरिष्ठ काँग्रेस नेते मीरा कुमार ,तारिक अन्वर ,शत्रुघ्न सिन्हा,कीर्ती आझाद, शकील अहमद आणि संजय निरुपम यांचाही समावेश आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी निवडणूक प्रचारासाठीच्या पक्षाच्या प्रसिद्धी समिती, मीडिया समन्वय समिती,कायदा समिती, जाहीर सभा समिती आणि कार्यालय व्यवस्थापन समित्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे.  बिहार विधानसभा निवडणुकीचे मतदान 28 ऑक्टोबर ,3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर असे तीन तारखांना होणार आहे.

 सुबोध कुमार प्रसिद्धी समितीचे समन्वयक

काँग्रेस नेते सुबोध कुमार हे बिहार विधानसभा निवडणूक प्रसिद्धी समितीचे समन्वयक असतील तर जयेया मिश्रा सह संवयक म्हणून काम करतील.काँग्रेस प्रवक्ते पावन खेडा यांच्यावर मीडिया समन्वय समितीचे चेअरमन म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रेमचंद मिश्रा या समितीचे समन्वयक तर राजेश राठोड सह समन्वयक असतील. ब्रिजेश कुमार मुनान हे जाहीर सभा आणि वाहतूक समितीचे समन्वयक ,तर वरूण चोप्रा कायदे समितीचे चेअरमन म्हणून काम करतील.