विद्यार्थ्यांसाठीची व्हिसा प्रक्रिया वेगवान करा, सत्यजीत तांबे यांची परराष्ट्रमंत्र्यांना विनंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानातून कॅनडा किंवा इतर देशांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्या व्हिसा मिळण्यात प्रचंड अडचणी येत असून व्हिसा मिळण्यासाठी खूप दिरंगाईचाही सामना करावा लागत आहे. ही बाब ध्यानात घेऊन काँग्रेसचे युवा नेते सत्यजीत तांबे यांनी थेट परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. ही व्हिसा प्रक्रिया वेगवान झाली, तर हजारो विद्यार्थ्यांना दरवर्षी दिलासा मिळेल.

हिंदुस्थानातून परदेशात शिकायला जाणारे विद्यार्थी ऑगस्ट-सप्टेंबर किंवा नोव्हेंबर-डिसेंबर या काळात सर्वाधिक व्हिसा अर्ज सादर करतात. कॅनडा, जर्मनी, युके अशा देशांमध्ये शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे नवीन वर्ष ऑक्टोबर किंवा जानेवारीदरम्यान सुरू होते. मात्र या विद्यार्थ्यांना व्हिसा मिळण्यासाठीची प्रक्रिया प्रचंड दिरंगाईची असून अनेकदा दीड-दीड महिना प्रतीक्षा करावी लागते.

नेमकी हीच बाब ध्यानात घेऊन सत्यजीत तांबे यांनी परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांना विनंतीपत्र पाठवत ही प्रक्रिया वेगवान करण्याची विनंती केली. व्हिसासाठी अर्ज करण्याआधी विद्यार्थी परदेशातील विद्यापीठांमधील आपला प्रवेश निश्चित करतात. त्यानंतर त्या देशांमध्ये राहण्याची सोयदेखील पाहतात. तिकिटांचा खर्चही त्यांनी केलेला असतो. मात्र ऐन वेळेपर्यंत व्हिसा न मिळाल्याने त्यांना प्रचंड मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. अनेकदा एवढं सगळं करून वेळेत व्हिसा न आल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलावा लागतो. परिणामी वेळ आणि पैसा दोन्हीचा अपव्यय होतो, असं या पत्रात म्हटलं आहे.

सत्यजीत यांनी लिहिलेल्या पत्रात आंतरराष्ट्रीय सल्लागारांनी संकलित केलेल्या माहितीचाही समावेश आहे. या माहितीनुसार अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ‘सप्टेंबर अखेरपर्यंत विद्यापीठात हजर राहा अन्यथा प्रवेशाला मुका’, असे बजावले आहे. यंदा 35 ते 50 हजार विद्यार्थी त्यांचा व्हिसा मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या विद्यार्थ्यांना त्यांच्या व्हिसा अर्जाबद्दलही अद्याप काहीच माहिती मिळालेली नाही. या विद्यार्थ्यांचे अर्ज नामंजूर झाले किंवा प्रवेशाची तारीख टळून गेल्यानंतर त्यांना व्हिसा मिळाला, तर त्यांचं वर्ष वाया जाणार आहे.

ही बाब परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देत सत्यजीत तांबे यांनी त्यांना या प्रक्रियेत हस्तक्षेप करून ती वेगवान करण्याची विनंती केली आहे. ही प्रक्रिया वेगवान झाली, तर हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य सुरक्षित होईल, असंही तांबे यांनी या पत्रात म्हटलं आहे.