
सामना ऑनलाईन । बागपत
दलित समाज आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून काँग्रेस अफवा आणि खोटय़ा गोष्टी पसरवत आहे, असा आरोप करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी घराण्यावर जोरदार हल्ला चढवला. लोकसभा पोटनिवडणूक होणाऱ्या कैराना मतदारसंघाच्या शेजारीच मोदी यांनी ‘ईस्टर्न पेरिफेरल एक्स्पेस वे’चे उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते.
शेतकऱ्याने आपले शेत दुसऱ्याला कसण्यासाठी दिले तर त्यावर १८ टक्के ‘जीएसटी’ लागणार असल्याची अफवा सध्या पसरवली जात असल्याचे माझ्या कानावर आले आहे. तशा अफवांकडे लक्ष न देता त्या पसरवणाऱ्यांच्या विरोधात सरळ तक्रार करा, असे आवाहन मोदी यांनी केले.
आपले सरकार गरीबांसाठी राबवत असलेल्या योजनांमध्ये काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष खोडा घालण्याच्या कारवाया करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला. मोदीला विरोध करण्याच्या नादात काँग्रेसचे लोक देशाच्या विरोधातही भूमिका घेतील, असे मला वाटले नव्हते, असे ते म्हणाले.
काँग्रेसच्या राजवटीत एका दिवसात १२ कि.मी. हायवे बनवला जायचा. आपले सरकार मात्र दिवसभरात २७ कि.मी. हायवेची बांधणी करीत आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, स्वच्छ भारत योजना असो, गरीब महिलांना गॅस कनेक्शन असो, शौचालयाची बांधणी असो की, गरीबांचे बँक खाते उघडणे असो, काँग्रेसला हे सारे काम म्हणजे विनोद वाटतो. आमच्या योजनांची टिंगलटवाळी केली जाते.
दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खोटय़ा गोष्टी पसरवण्याच्या काँग्रेसने चालवलेल्या कारवायांमुळे देशात अस्थिरता माजू शकते, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आपल्या सरकारने दलित ऍट्रॉसिटी ऍक्ट अधिक कठोर केला असून त्यात गुन्हा ठरणाऱ्या कृत्यांची संख्या २२ वरून ४७ पर्यंत वाढवली आहे याकडे मोदी यांनी आपल्या भाषणात लक्ष वेधले.
सरकारचा ‘अध्यादेश’ फाडून फेकण्यापर्यंत मजल जे लोक मारतात ते संसदेने संमत केलेल्या कायद्याचा आदर कसा करतील? एका घराण्याची आराधना करीत आलेली माणसे लोकशाहीची पूजा करू शकत नाहीत.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान
























































