
दाट धुके, कमी दृश्यमानता ही अजित पवार यांच्या विमानाच्या अपघाताची प्राथमिक कारणे दिसत असली तरी या अपघातावर संशय व्यक्त करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक नेत्यांनी याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, विकिपीडियावर 27 जानेवारीलाच अजित पवारांचे निधन झाल्याचे अपडेट पडले होते, असा दावा करणाऱया अनेक पोस्ट एक्सवर स्क्रीनशॉटसह पडल्या असून त्यामुळे संशयाचे धुके अधिकच दाट झाले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर ज्या विमानातून ते प्रवास करत होते ती कंपनी आता संशयाच्या भोवऱयात सापडली आहे. विमान अपघातानंतर आता हे विमान ज्या कंपनीचे आहे, त्या कंपनीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. लँडिंग करायला अवघी काही मिनिटे शिल्लक असताना हा अपघात झाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. यावर वरिष्ठ पत्रकार सुहेल सेठ यांनी ट्विट करत व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत.
सुहेल सेठ ट्विटमध्ये म्हणतात, आज सकाळी जो विमान अपघात झाला ते विमान व्हीएसआर एविएशनच्या मालकीचे होते. ते सराईत गुन्हेगार आहेत. त्यांचे हे दुसरे विमान व्रॅश झाले आहे. पिता-पुत्र ही कंपनी चालवतात. ते लोकांना डीजीसीए इंडिया हे आमच्या खिशात आहे, असे लोकांना सांगत फिरत असतात. ही चार्टर पंपनी बंद केली पाहिजे, असे सेठ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. सुहेल सेठ यांच्यानंतर तेहसीन पुनावाला यांनीदेखील ट्विट केले आहे. अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते, ते विमान व्हीएसआर एविएशनचे होते. हे त्या कंपनीचे दुसरे विमान व्रॅश झाले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात अनेक विमाने, हेलिकाॅप्टर व्रॅश झाली आहेत. डीजीसीएने आता तरी यात लक्ष घालून कडक पावले उचलावीत, असे म्हटले आहे.
विकिपीडियावर एक दिवस आधीच अपडेट पडल्याचा दावा
अजित पवारांच्या विकिपीडिया पेजची एडिट हिस्ट्री तपासली असता त्यामध्ये काल 27 तारखेलाच रात्री कोणीतरी ‘अजित देवेंद्र पवार’ असा बदल केलेला दिसतो. हा बदल नंतर काढून टाकला. त्यानंतर आज सकाळी अपघातानंतर 9.34 पासून धडाधड अजित पवारांच्या निधनाबाबतचे एडिट्स सुरू झाले. त्यामध्ये एका एडिटमध्ये शिवीगाळ, एका एडिटमध्ये रिप असा उल्लेख, त्यानंतर एका एडिटमध्ये मृत्यूची तारीख 27 जानेवारी असे वारंवार बदल आणि दुरुस्ती हे चक्र सुरु होतं. अशाप्रकारच्या कृत्यांची चौकशी झाली तर यामागचे उद्देश समोर येऊ शकतात, असे प्रथमेश पाटील या युजरने त्याच्या पोस्टमध्ये नमूद केले आहे, आलोक कुमार, सचिन रामदास सूर्यवंशी, शालू, क्षितीज या युजर्सनी एक दिवस आधीच निधनाचे अपडेट कसे, असा सवाल केला.
हे स्क्रिप्टेड, कट कालच शिजला होता… डिजिटल क्रिएटरचा आरोप
बाळासाहेब कदम या डिजिटल क्रिएटरने यावर शंका घेत हा अपघात आहे की घात आहे, असा सवाल केला आहे. विकिपीडियावर निधनाचे अपडेट 20 तास आधी कसे पडले. हे स्क्रिप्टेड आहे, प्लान्ड आहे. यामागे पुणीतरी आहे. अजितदादांच्या प्रोफाइलवर कालच पुणीतरी छेडछाड केली होती. कालच अंधभक्त विकृतांनी उच्छाद मांडला होता. कट आधीच शिजला होता. हे पेज आज सकाळीही तसेच होते. निधनानंतर काही वेळात कुणीतरी घाईघाईत तारीख बदलली आणि नवे अपडेट टाकण्यात आले, असे त्याने फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले.
चौकशी व्हायला हवी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने मला प्रचंड धक्का बसला आहे. मी स्तब्ध आहे. या दुर्घटनेने मला प्रचंड दुःख झाले आहे. अजित पवार यांचे काका शरद पवार यांच्यासह अजित पवार यांचे कुटुंब, सर्व मित्र आणि कार्यकर्त्यांप्रति माझ्या संवेदना आहेत. या अपघाताची चौकशी व्हायला हवी. – ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल
अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती विमान अपघातात निधन झाल्याने मला खूप दुःख झाले आहे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबाला व समर्थकांना हे कधीही भरून न येणारे नुकसान सहन करण्याची शक्ती देवो. अपघाताची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे. विनम्र श्रद्धांजली. – लालूप्रसाद यादव, माजी मुख्यमंत्री, बिहार
सखोल चौकशी होणे आवश्यक
अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनाने मला खूप धक्का बसला आहे. अजित पवारांची काम करण्याची एक स्वतःची वेगळी आणि शिस्तबद्ध शैली होती, हे नाकारता येणार नाही. त्यांच्या पत्नी, कुटुंब, मित्र आणि पक्षाच्या दुःखात मी सहभागी आहे. ज्या विमान अपघातात 6 जणांचा बळी गेला, त्या घटनेची अत्यंत योग्य आणि सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. – अॅड. प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी




























































