पालिकेच्या शाळांची अमेरिकेलाही भुरळ!

सामना ऑनलाईन, मुंबई

‘व्हर्च्युअल क्लासरूम’सह विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि सर्वांगीण शिक्षण देणाऱ्या मुंबई महापालिकेच्या शाळांची भुरळ अमेरिकेलाही पडली आहे. अमेरिकेचे वाणिज्य दूत एडगार्ड कागन यांनी पालिका शाळांना भेट देऊन या ठिकाणी मिळणारे शिक्षण, सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या हुशारीबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते.

अमेरिकेचे वाणिज्य दूत एडगार्ड डी. कागन यांनी पत्राद्वारे मुंबई पालिकेच्या दोन शाळांना भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार महापालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यानुसार कागन यांनी सुशोभीकरणानंतर चर्चेचा विषय ठरलेली ‘वरळी सी फेस मनपा शाळा’ आणि सन 1983 मध्ये ‘सिटी ऑफ लॉस एंजलिस’च्या तत्कालीन महापौरांनी दिलेल्या देणगीतून सुशोभित करण्यात आलेल्या माहीम परिसरातील पालिकेच्या शाळांना भेट दिली. यावेळी शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर, शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे, उपायुक्त मिलिन सावंत, शिक्षणाधिकारी  महेश पालकर, उपशिक्षणाधिकारी राजू तडवी आदी उपस्थित होते.

120 शाळांमधील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

पालिका शाळांना भेट दिल्यानंतर कागन यांनी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत 120 शाळांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे त्यांनी निरसनही केले. तसेच मनपा शाळेतील संगीत विभागात विद्यार्थ्यांच्या वाद्य वादनाचाही त्यांनी आनंद घेतला व विद्यार्थ्यांच्या संगीत साधनेचे कौतुक केले. वरळी सी फेस पालिका शाळेच्या वाचनालयातील पुस्तके चाळतानाच त्यातील काही इंग्रजी पुस्तकांबाबत त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. महापालिका शाळांमधील संगणक कक्ष, किज्ञान कक्षालाही त्यांनी भेटी दिल्या.

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये ‘व्हर्च्युअल एज्युकेशन’सारख्या  अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. टॅबद्वारे शिक्षण देण्याची व्यवस्था असणाऱ्या शाळांच्या इमारतीदेखील आकर्षक आहेत. इतकेच नाही तर या विद्यार्थी वाद्येही चांगल्या प्रकारे वाजवतात. माझ्याशी इंग्रजी भाषेत चांगल्या प्रकारे संवादही साधतात. हे सर्व पाहून मी भारावून गेलो आहे- एडगार्ड कागन,वाणिज्य दूत, अमेरिका