कंटेनर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू: आष्टी तालुक्यातील घटना

सामना प्रतिनिधी । आष्टी

पुणे येथून कंटेनरमध्ये माल भरून नागपूर येथे जात असताना मार्गातच गाव असल्याने जाता जाता आई वडील व मुलांना भेटून जावे यासाठी चालक स्वत:च्या गावी जात असताना रस्त्यातच अचानक चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला. यावेळी कंटेनर पलटी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि. १५ में रोजी पहाटे चारच्या सुमारास घडली. कल्याण विठ्ठल गायकवाड (४६) असे चालकाचे नाव आहे.

ब्रम्हगाव येथील कल्याण गायकवाड हे पुण्यास कंटेनर चालक म्हणून कामास होते. पुणे येथून MH-12 QG.-7404 या कंटेनर मध्ये माल भरून नागपूर येथे माल उतरवण्यासाठी जात असताना रस्त्यातच आष्टी पासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्रम्हगाव या आपल्या गावी जात असताना भरधाव वेगात असलेला त्यांचा कंटेनर पांढरी हाजीपुर गावच्या शिवारात गोलाईचा मळा या वळणावर आल्यानंतर कल्याण यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि कंटेनर जागीच पलटी झाला. गायकवाड यांच्या डोक्यास मार लागल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू’ झाला.

आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन ब्रम्हगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, एक बहिण, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस नाईक मच्छिंद्र उबाळे हे करत आहेत.