तळेकांटे येथे कंटेनर उलटला; प्रसंगावधानाने वाहनचालक बचावला

मुंबई- गोवा महामार्गावरील तळेकांटे येथे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास कंटेनरला अपघात झाला. चालकाला झोप अनावर झाल्याने त्याचा कंटेनरवरील ताबा सुटला आणि तो विरुद्ध दिशेला जाऊन दरीत कोसळला. कंटेनर झाडावर आदळल्याने बावनदीत जाता जाता बचावला. प्रसंगावधान राखत चालकाने कंटेनरमधून उडी मारल्याने तो थोडक्यात बचावला.

गोवा महामार्गावरून एक कंटेनर संगमेश्वरहून रत्नागिरीच्या दिशेने जात होता. तळेकांटे येथील गणेश मंदिराजवळ कंटेनर आला असता चालकाला झोप अनावर झाल्याने त्याला डुलकी लागली. यावेळी कंटेनर विरुद्ध बाजूला जाऊन दरीत कोसळला. डाव्या बाजूला एका मोठ्या झाडाला अडकल्याने तो बचावला. प्रसंगावधान राखत चालकाने लगेचच कंटेनरमधून उडी मारली. सुदैवाने चालकासमोर वाहन न आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. कंटेनर दरीत पडताना झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला आहे. अपघातानंतर सकाळच्या सुमारास वाहतूक काही काळ ठप्प होती.