प्रवेश प्रक्रिया सुरू असेपर्यंत ऑनलाईन नोंदणी सुरू ठेवा; युवासेनेची विद्यापीठाकडे मागणी 

मुंबई विद्यापीठाने प्रथम वर्ष प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया सुरू असेपर्यंत ऑनलाईन नोंदणी अर्ज भरण्याची लिंक सुरू ठेवावी, अशी मागणी युवा सेनेने केली आहे.

मुंबई विद्यापीठ संलग्नित स्वायत्त सह महाविद्यालयांमधील प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली गुणवत्ता यादी जाहीर होऊन प्रवेश सुरू झाले आहेत. प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठ नोंदणी अर्ज भरणे अत्यावश्यक आहे. या अर्जात प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयाचे नाव अनिवार्य असल्याने अनेक विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत नाव येऊनही प्रवेश घेण्यास अडचण येत आहे. कारण विद्यापीठाने अर्ज भरण्याची ऑनलाईन लिंक बंद केली आहे. वास्तविक नोंदणी आणि प्रवेश यांचा काहीही संबंध नसताना लिंक बंद केल्याने विद्यार्थ्यांची अडचण होत आहे.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे विद्यार्थ्यांनी यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, व्यवस्थापन परिषद सदस्य शीतल शेठ-देवरुखकर, मिलिंद साटम, शशिकांत झोरे आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्याकडे लिंक पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.