कंत्राटी बेस्ट कामगारांचे आंदोलन अखेर मागे; बेस्ट कामगार सेनेच्या दणक्यानंतर थकीत वेतन जमा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्ट उपक्रमातील भाडेतत्वावर सेवा करणार्‍या सुमारे 500 चालकांनी वेतन मिळत नसल्याने गेले दोन दिवस पुकारलेले काम बंद आंदोलन अखेर बेस्ट कामगार सेनेच्या मध्यस्तीने मागे घेण्यात आले आहे. बेस्ट कर्मचारी सेनेच्या दणक्यानंतर कंत्राटदाराने रखडलेला पगार कामगारांना दिल्याने कामबंद आंदोलन मागे घेण्यात आल्याचे कर्मचार्‍यांनी जाहीर केले.

बेस्टमध्ये भाडेतत्वावरील बसेस चालकांचे कंत्राट घेतलेल्या एम.पी.ग्रुप या कंपनीने पगार थकविल्याने वडाळा, वांद्रे, विक्रोळी, कुलाबा, कुर्ला या आगारातील बसचालकांनी कालपासून काम बंद आंदोलन पुकारल्याने प्रवाशांचे हाल झाले. त्यामुळे या पाच डेपोतून 275 बसेसचे शेड्यूल असताना प्रत्यक्षात 74 बसेस सुटल्याने प्रवाशांना इतर वाहतूक साधनांचा आधार घ्यावा लागला. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने 104 जादा फेर्‍या चालवून प्रवाशांना दिलासा दिला.

खाजगी एम. पी. ग्रुप या कंत्राटदाराने गेली तीन महिने कर्मचाऱ्यांचा पगार दिला नसल्याने कामगारांनी गुरूवारपासून कामबंद आंदोलन केले. त्यानंतर बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी वेट लीज कामगार सेनेचे युनिट प्रमुख दानसिंग रावत, भुपेंद्र नांदोस्कर यांच्यासह वडाळा व इतर आगारातील कामगारांची प्रत्यक्ष भेट घेतली.

सामंत यांनी एम.पी.ग्रुप कंपनीच्या मालकाशी तातडीने बोलणी करून कामगारांची देणी परत करण्यास सांगितले. सामंत यांच्या मध्यस्तीने एम.पी.ग्रुपच्या मालकाने सर्व कामगारांच्या थकीत वेतन आजच त्यांच्या खात्यात जमा केले. या मध्यस्तीबद्दल सामंत यांचे आभार मानत पुन्हा कंत्राटी कामावर पुन्हा कामावर हजर झाले.

कंत्राटदारावर होणार कारवाई
बेस्टने वेटलिजच्या बस कंत्राटदारांशी केलेल्या कराराचा भंग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एम. पी. ग्रुपच्या कंत्राटदारावर आता अटी आणि शर्थीचा भंग झाला असल्याने त्यांच्यावर कारवाई करणार आहे. कंत्राटातील अटी आणि शर्ती नुसार दंड वसुलीपासून ते थेट कंत्राट रद्दबातल करणे यापैकी योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती बेस्टच्या सूत्रांनी दिली.