
सामना प्रतिनिधी । नांदेड
गेल्या महिन्याभरापासून येथील शासकीय रेतीघाटाचे ठेकेदार सगरोळी गावच्या मजुरांची लाखो रूपयांची मजुरी न देता घाटावरील जेसीबीसह सर्व सामान गुंडाळून रातोरात पसार झाले आहेत. ठेकेदार 30 मे रोजी पसार झाल्याचे सांगण्यात येत असून मजुरीचे पैसे मिळाले नसल्याने मजुरांमध्ये खळबळ उडाली आहे. या वर्षी सगरोळी गावालगतच्या माजंरा नदीपात्रातील एका गटाचा लिलाव होऊन लिलाव प्रक्रियेद्वारे हा घाट सुर्यकांत वैजनाथ पवार या ठेकेदाराने रेतीचे उत्खनन करण्यासाठी घेतला होता. हे काम एक महिन्यापासून चालू होते. मात्र, अचानक कुणालाही कल्पना न देता व प्रशासनाच्या कोणत्याही सूचना नसताना अचानक 30 मे रोजी मध्यरात्री ठेकेदार घाट सोडून पसार झाला आहे.
काही दिवसांपूर्वी देगलुर येथे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी बनावट पावत्यांच्या संशयावरून 28 ट्रक पकडून लाखो रूपयांचा दंड आकारला होता. बिलोलीचे उपजिल्हाधिकारी अमोलसिंह भोसले यांनी पहिल्याच दिवशी दोन वाहनांवर दंडात्मक कारवाई केली होती. तहसिलचे फिरत्या पथकाने दोन दिवसात सहा वाहनावर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईच्या दंडाची अंदाजे रक्कम पन्नास ते साठ लाख रूपये होती. ती रक्कम भरल्याशिवाय ट्रक बाहेर पडणार नाहीत व ट्रक मालक पैसे सोडणार नाहीत. या भितीने घाईघाईने ठेकेदाराने रात्रदिवस काम करत मजुरांकडून आणि जेसीबीद्वारे रेती उत्खनन करीत दररोज दोनशे ते अडीचशे ट्रक भरले. आठवडाभरात दोन ते अडीच हजार ट्रक भरून काढले. एका ट्रकला सात ते साडेसात हजार रूपये भरवई तो देत असे. या प्रमाणे पंधरा दिवसाचे पैसे चाळीस ते पन्नास लाख रूपयांपेक्षा जास्त देणे बाकी होते. मजुरांनी व सरपंचानी दररोज विचारणा केली आसता एक ते दोन दिवसात देईन असे सांगत असे. दंडाची रक्कम पन्नास ते साठ लाख रूपये व मजुरांची मजुरी चाळीस ते पन्नास लाख रूपये एवढी जवळपास एक कोटी रूपये थकवून ठेकेदार 30 मे रोजी मध्यरात्री घाटावरील सर्व साहित्यासह फरार झाला.
सरपंचासह गावकऱ्यांनी घाटावरील पळून जाणारी एक जेसीबी जप्त करून गावच्या देखरेखीखाली ठेवली आहे. गावचे सरपंच, उपसरपंच व प्रतिष्ठित नागरिक यांच्या मध्यस्थीने आलेले मजूर मजुरीसाठी आता त्यांनाच वेठीस धरीत आहेत. ठेकेदार रातोरात फरार झाल्याने गावात एकच खळबळ माजली आहे. गावकऱ्यांनी ठेकेदाराची शोधाशोध सुरू केली आहे. या ठेक्यावर सध्या रिकामे दोनशे ते अडीचशे ट्रक रमेश मोतीवार यांच्या शेतात ठेवण्यात आले आहेत. ट्रक ठेवण्यासाठी शेतकऱ्याला मोबदला म्हणून काही रूपये देण्याचे ठेकेदाराने कबूल केले होते. मात्र, त्यांनाही पैसे देण्यात आले नाही. म्हणून शेतकरीही आता हे सर्व ट्रक अडवून पैसे दिले तरच ट्रक सोडण्यात येतील. अन्यथा ट्रक याच ठिकाणी रहातील अशी भूमिका घेत आहेत.




























































