झाडाचा बुंधा बुजवणाऱ्या कंत्राटदाराची ‘खोड’ मोडणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

रस्तेदुरुस्तीच्या नावाखाली झाडांचा बुंधा काँक्रीटने बुजवणाऱ्या कंत्राटदारांची पालिका चांगलीच ‘खोड’ मोडणार आहे. झाडाचा बुंधा बुजवल्याने झाड पडण्याचे किंवा मरण्याचे प्रमाण वाढल्याने कंत्रादारांना होणाऱ्या दंडात पालिकेने दुपटीने वाढ केली आहे. संपूर्ण मुंबईत याची अंमलबजावणी करण्यासाठी त्या त्या विभागातील अधिकाऱ्यांना निर्देशही देण्यात आले आहेत.

प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांना पाहणी करून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे पालिकेचे मुख्य अभियंता विनोद चिठोरे यांनी सांगितले. झाडांचे बुंधे काँक्रीटने बुजवणाऱ्या कंत्राटदारांना याआधी अडीच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत होता, मात्र कंत्राटदारांकडून झाडाचे बुंधे काँक्रीटने बुजवण्याचे प्रकार सुरूच असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याला आळा घालून कंत्राटदारांना जरब बसवण्यासाठी दंड दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अनेक ठिकाणी रस्ते बांधकामांत झाडांच्या बुंध्यापर्यंत काँक्रीटीकरण केल्याचे समोर आले आहे. परिणामी झाडांच्या बुंध्यापर्यंत पाणी मिळत नाही. यामुळे अनेक झाडे सुकून पडण्याची शक्यता अधिक असते. आतापर्यंत झाडे पडणे, फांद्या पडण्याच्या  तब्बल दीड हजार घटना घडल्या आहेत. या दुर्घटनांमध्ये 21 जण जखमी झाले असून सातजणांना जीवही गमवावा लागला आहे. पावसाळ्यात हे प्रमाण अधिक असते.