
सामना प्रतिनिधी । गोवा
डिचोली तालुक्यातील परिस्थिती नियंत्रणात, अंजूणे आणि तिलारी धरणातून सर्व दरवाजे उघडून पाणी सोडले जात असले तरी पाण्याचा प्रवाह कमी असल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेऊन डिचोली मधील पुर संकटाचा आढावा घेतला. यावेळी मयेचे आमदार प्रवीण झांट्ये, जिल्हाधिकारी आर.मेनका, मामलेदार प्रवीण पंडीत उपस्थित होते.
साखळी नदीची पातळी 2.30 मीटरवर तर डिचोली नदीची पातळी 2.20 मिटर वर खालावली आहे. आमठाणे किंवा इतर कोणत्याही धरणा बद्दल कोणतीही चिंतेची बाब नसल्याची माहिती डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडीत यांनी दिली आहे.
दरम्यान साळ मधील 25 तर मेणकुरे मधील 7 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. ही मंडळी आपल्या नातेवाईकांकडे मुक्कामास गेली आहेत. आमोणा मधून 7 जणांची पुराच्या पाण्यातून सुटका करण्यात आली आहे. या सातजणांनी देखील आपल्या नातेवाईकांकडे आसरा घेतला आहे.
बागवाडा-पीळगाव येथील 10 जणांची पुराच्या पाण्यातून सुटका करण्यात आली असून ही सर्व मंडळी आपल्या खाजगी ठिकाणी राहण्यास गेली आहेत.डिचोली तालुक्यातील परिस्थितीवर मामलेदार पंडीत नजर ठेवून असून कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.




























































