
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कल्याण आगारात ‘आगार व्यवस्थापक’ म्हणून कार्यरत असलेले वादग्रस्त महेश भोये यांचे पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे बदली झाल्याचे आदेश निघून तीन महिने उलटले आहेत, पण गेल्या 11 वर्षांपासून याच आगारात राहून ‘कल्याण’ झालेल्या भोये हे अजूनही नालासोपाऱ्यात रुजू झालेले नाहीत. भोयेंचे ‘कल्याण’ झाले, ते नालासोपाऱ्याचे ‘तिकीट’ कधी काढणार, असा सवाल एसटी कर्मचारी संघाने केला असून याबाबत परिवहन मंत्र्यांना पत्र लिहून भोयेंच्या कारभाराचा पाढा वाचला आहे.
कल्याण आगार हे ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे आगार आहे. सध्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत पुनर्विकासाचे काम येथे सुरू आहे. त्यामुळे काही बससेवा तात्पुरत्या स्वरूपात विठ्ठल वाडी आगारातून किंवा जवळच्या बॅडमिंटन कोर्ट परिसरातून चालविल्या जातात. आगाराचा कारभार विठ्ठलवाडी डेपोतून सुरू असल्याने तेथील आगार व्यवस्थापक भोये यांची आणि विठ्ठलवाडी आगाराचे व्यवस्थापक नवजोत गावडे यांच्यात घनिष्ठ मैत्री झाली. त्यामुळे गावडे यांनी भोये यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठलवाडी डेपोत केक कापत फटाके वाजविले.
11 वर्षांपासून कल्याणचा मोह सुटेना
तीन वर्षे झाली की अधिकाऱ्यांची बदली करावी लागते, पण भोये मागील 11 वर्षांपासून ते कल्याण डेपोमध्ये कार्यरत आहेत. सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, प्रभारी डेपो मॅनेजर, नियमित डेपो मॅनेजर ही सर्व पदे त्यांनी या ठिकाणी भूषविली आहेत, पण बदलीच्या ठिकाणी ते का रुजू होत नाहींत, अशी चर्चा आगारातील कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.
सीएनजीचा भडका उडाला असता तर…
कल्याण आगारात एसटीचा सीएनजी पंप आहे. या आगारात ज्वलनशील पदार्थ आणण्यास सक्त मनाई आहे. मात्र भोयेंच्या वाढदिवशी या आगारात फटाके वाजवण्यात आल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. त्याची गंभीर दखल घेत परिवहन मंडळाने गावडे यांची बदली वेंगुर्ला तर भोये यांची बदली नालासोपारा येथे केली. त्यानंतर गावडे यांनी आपला कार्यभार स्वीकारला. मात्र भोये यांनी आदेश येऊन तीन महिने उल टले तरी अद्याप नवीन कार्यभार स्वीकारला नाही. ‘सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघा’चे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रल्हाद सपकाळ यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे या बाबीकडे लक्ष वेधत प्रवाशांना मिळणाऱ्या अपुऱ्या सोयीसुविधा, राज्य कर्मचाऱ्यावर होत असलेला अन्याय आणि कल्याण आगारातील भोंगळ कारभार याबाबत परिवहन मंत्री सरनाईक यांना निवेदन दिले.

























































