विलासरावांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील! भाजपच्या रवींद्र चव्हाण यांचे वादग्रस्त वक्तव्य

महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख म्हणजे लातूरकरांची अस्मिता! आजही लातुरात अनेकांचा दिवस विलासरावांचे दर्शन घेऊन सुरू होतो. आज लातूरकरांच्या अस्मितेवर, श्रद्धास्थानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी द्वेषाच्या गुळण्या टाकल्या. लातूर शहरातून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील याची आपल्या मनात कोणतीही शंका नाही असे वादग्रस्त विधान चव्हाण यांनी केले. या विधानावरून लातुरात संतापाची लाट उसळली आहे.

दिवंगत विलासराव देशमुख यांची राजकीय संस्पृती जपणारे नेते म्हणून महाराष्ट्रात ओळख आहे. विलासरावांच्या दिलखुलास वृत्तीमुळे त्यांचे सर्व पक्षात मित्र होते; परंतु विलासरावांची मैत्री गाजली ती दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबरची. दोन्ही नेत्यांनी आपल्यातले मैत्र कधी लपवले नाही. मात्र आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देशमुख आणि मुंडे यांच्या मैत्रीच्या नात्यालाच काळिमा फासण्याचे काम केले.

लातुरात आज महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून, लातूरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील असे विषारी गरळ ओकले. चव्हाणांचे हे वक्तव्य अवघ्या काही मिनिटांत लातुरात व्हायरल झाले आणि एकच संतापाची लाट उसळली. रवींद्र चव्हाण यांनी माफी मागावी आणि आपले विधान बिनशर्त मागे घ्यावे अशी मागणी होत आहे.

पत्रकारांना टाळून चव्हाण पळाले

लातुरात भाजपने उपऱ्यांना तिकिटे दिल्यामुळे निष्ठावंतांनी बंड पुकारून वेगळी चूल मांडली आहे. त्यामुळे भाजपच्या डोक्याला आधीच ताप झाला आहे. त्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुखांबद्दल गरळ ओपून त्यात आणखी भर घातली. मेळावा संपताच पत्रकारांनी चव्हाणांकडे धाव घेतली; परंतु रवींद्र चव्हाण पत्रकारांना टाळून अक्षरशः तेथून पळून गेले.

विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातुरातून पुसणारा अजून कोणी जन्माला आलेला नाही. विलासराव देशमुखांचा अपमान लातूरकर कधीही सहन करणार नाहीत.

हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष