
अतिवृष्टीने राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. त्यातच सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना काही लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, असे वादग्रस्त विधान करत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. पाटील म्हणाले, निवडणुकीत आम्हाला निवडून यायचंय म्हणून आम्ही आश्वासनं देतो. निवडणुकीच्या काळात कुणी गावात नदी आणून द्या अशी मागणी केली तर त्यालाही गावात नदी आणून देण्याचे आश्वासन दिले जाते. त्यामुळे लोकांनी काय मागायचे हे ठरवले पाहिजे. दरम्यान, टीका होताच या वक्तव्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, अशी सारवासारव त्यांनी केली.