साईबाबांवरील वक्तव्याचा वाद चिघळला; शिर्डी ग्रामस्थ आक्रमक, अरुण गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

श्री साईबाबांनी त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांच्या भक्त, सेविका लक्ष्मीबाई शिंदे यांना दिलेली चांदीची नऊ नाणी नेमकी कोणाकडे आहेत, यावरून निर्माण झालेला वाद आता गंभीर वळणावर पोहोचला आहे. या प्रकरणात साईभक्त लक्ष्मीबाई ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत साईबाबांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून, धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणावरून गायकवाड यांच्याविरोधात शिर्डी ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

धर्मादाय आयुक्तांनी नाण्यांच्या मालकी हक्कासंदर्भात दिलेल्या निर्णयानुसार, सदर नाणी अरुण गायकवाड यांच्या ट्रस्टकडे असल्याचे नमूद केले आहे. याबाबत गायकवाड त्यांनी पत्रकार परिषदेत दावा करताना, ‘आमच्याकडीलच नाणी खरी असून, शिंदे कुटुंबाकडील नाणी बनावट आहेत,’ असे वक्तव्य केले. तसेच ‘साईबाबांचा डीएनए करा म्हणजे सत्य समोर येईल,’ असेही म्हटल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

या वक्तव्याच्या निषेधार्थ शिर्डी ग्रामस्थांनी गायकवाड यांच्या विरोधात जोरदार आंदोलने केली. त्यांच्या घर, दुकानासमोर आंदोलन करत त्यांच्या फोटोवर शाई ओतून निषेध नोंदवण्यात आला. याप्रकरणी गायकवाड यांनी आंदोलनाआधीच एक व्हिडीओ प्रसिद्ध करून सार्वजनिकरीत्या माफी मागितली असली, तरी ग्रामस्थांचा संताप शमलेला नाही.
याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याचा ठपका ठेवून अरुण गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला. गायकवाड यांनी नाण्यांबाबत खोटी माहिती देऊन साईभक्तांची फसवणूक केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी गायकवाड यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.

या फिर्यादीत शिवाजी गोंदकर, कलमाकर कोते, अभय शेळके, सचिन तांबे, नीलेश कोते, बाबासाहेब कोते, सर्जेराव कोते, संजय शिंदे, नितीन कोते, ताराचंद कोते, सुजित गोंदकर, संदीप सोनवणे, दीपक वारुळे, योगेश जगताप, प्रमोद गोंदकर, कैलास आरणे, किरण बडे, अविनाश गोंदकर, प्रसाद लोढा, विकास गोंदकर, अनुप गोंदकर, राजेंद्र भुजबळ, गणेश कोते, सचिन कोते, नरेश सुराणा, यांच्यासह ग्रामस्थांच्या धार्मिक भावना दुखावल्याचे म्हटले आहे.