
भरवशाचे सर्व फलंदाज एकामागोमाग बाद झाल्यामुळे पंजाब किंग्ज अडचणीत सापडला होता, पण आयपीएल पदार्पण करत असलेल्या कूपर कोनोलीने 72 धावांची सुपर डुपर हिट खेळी करत संघाला 5 चेंडूआधीच गुजरात टायटन्सविरुद्ध 3 विकेटनी विजय मिळवून दिला. या जोरावर श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्सने शुभमन गिलचा आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात दणदणीत पराभव केला.
दमदार सुरुवात लाभल्यानंतरही गुजरात टायटन्सला अपेक्षित धावा न गाठता आल्यामुळे त्यांना पंजाब किंग्सला रोखण्यात अपयश आले. गुजरातचे 163 धावांचे आव्हान कूपर कोनोली आणि प्रभसिमरन सिंगने अत्यंत माफक करून टाकले. दोघांनी 76 धावांची भागी रचत संघाला अर्धा टप्पा गाठून दिला. प्रभसिमरन 4 षटकार खेचत 37 धावांवर बाद झाला. त्यानंतर कूपरने डावाची आणि संघाच्या विजयाची सूत्रे आपल्या हाती ठेवत संघाचा विजय जवळजवळ निश्चित केला. 2 बाद 111 अशा सुरुवातीनंतर पंजाबचा विजय सोप्पा झाला होता. पण अचानक श्रेयस अय्यर (18), नेहाल वढेरा (3), शशांक सिंह (4), मार्कस स्टॉयनिस (0) हे चार फलंदाज धडाधड बाद झाल्यामुळे 6 बाद 118 अशी बिकट अवस्था झाली. तेव्हा कोनोलीने संकटमोचकाची भूमिका साकारत माकाx यान्सनसह 26 धावांची भर घालत संघाला विजयासमीप नेले. कूपरने शेवटपर्यंत मैदानात ठाण मांडून पंजाबला विजयी सलामी मिळवून दिली. कोनोलीने 5 षटकार आणि तितकेच चौकार ठोकत 44 चेंडूंत 72 धावांची भागी रचत संघाला सहजसुंदर सुपरडुपर हिट विजय मिळवून दिला.
गुजरात टायटन्सच्या डावाला एकही अर्धशतक लाभले नसले तरी ते 162 धावांपर्यंत मजल मारू शकले. साई सुदर्शन (13) अपेक्षित सुरुवात करू शकला नाही. मात्र शुभमन गिलने जोस बटलरच्या साथीने 46 धावांची भर घातली. गिलने 27 चेंडूंत 39 धावा केल्या, त्याने 6 चौकार लगावले, पण त्याच्या बॅटीतून एकही षटकार निघाला नाही. याची भरपाई बटलरने केली त्याने 2 षटकार खेचत 38 धावा केल्या. ग्लेन फिलिप्सनेही 25 धावांची भर घातली. तो 14 व्या षटकांत बाद झाल्यानंतर गुजरातच्या मधल्या फळीतील फलंदाजाला विजयकुमार विशाकला तोंड देता आले नाही. परिणामतः त्यांचा धावांचा वेग वाढला आला नाही आणि ते 6 बाद 162 पर्यंत संघाचा धावफलक खेचू शकले.































































