
सन 2019च्या महापुरावेळी आलेल्या कटू अनुभवांमुळे 2020ला महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांनी समन्वयाने परिस्थिती हाताळली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही कोल्हापुरातील पूरस्थितीवर नियंत्रण राखता आले. यंदाही गेल्या वर्षीप्रमाणेच कर्नाटकशी समन्वय राखून संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
आज शिरोळ येथील तहसीलदार कार्यालयामध्ये महापुरासंबंधित उपाययोजना आखण्याबाबत आढावा बैठक घेतली.
या आढावा बैठकीमध्ये संभाव्य महापुराच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला, जेणेकरून भविष्यात अतिपर्जन्यवृष्टीमुळे तालुक्याला महापुराचा धोका उद्भवणार नाही. pic.twitter.com/TkUe5mHlSe
— Rajendra Patil Yadravkar (@yadravkar) May 24, 2021
कर्नाटकचे पाटबंधारेमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या राजीनाम्यामुळे पाटबंधारेचा पदभार सध्या मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यामुळे गरज भासल्यास बेळगावच्या पालकमंत्र्यांशी बैठक घेऊन दोन्ही राज्यांमध्ये समन्वय ठेवत संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी प्रयत्न आहेत. यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने सुरू कराव्याअत, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असेही राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी सांगितले.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील संभाव्य पूरस्थितीबाबत तालुका प्रशासन व आपत्कालीन विभागाने सुरू केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी यड्रावकर यांनी मंगळवारी शिरोळ तहसीलदार कार्यालयात मान्सूनपूर्व आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.
तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांनी उपाययोजनांबाबत माहिती देऊन संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन सज्ज असल्याचे सांगितले. पाटबंधारे, बांधकाम, आरोग्य, वीज, कृषी, पशुसंवर्धन, परिवहन या विभागांच्या अधिकाऱयांनीही माहिती दिली.
कृषी विभागाने महापुराच्या काळात निश्चित केलेल्या पूररेषेच्या आतील पिकांचे महापुरापूर्वी सर्वेक्षण करता येईल का, याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना राज्यमंत्री यड्रावकर यांनी दिल्या. एसटी महामंडळाने 2019चा अनुभव पाहाता ज्या ठिकाणाहून लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करावयाचे असते, अशा ठिकाणी पूर येण्यापूर्वी बसेसची व्यवस्था करावी, असे आदेशही त्यांनी दिले. महापुराचे संकट जाणवताच नागरिकांनी स्वतः बाहेर पडावे व जनावरांनादेखील सुरक्षितस्थळी हलवावे, याबाबतच्या सूचना तालुका प्रशासनाने ग्रामपंचायतींना द्याव्यात. कुरुंदवाड, शिरोळ व जयसिंगपूर नगरपरिषदेने पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई करावी. ग्रामपंचायतींनीही गावातील व गावाबाहेरचे नाले व गटारी स्वच्छ कराव्यात, याबाबत गटविकास अधिकाऱयांनी ग्रामपंचायतींना सूचना द्याव्यात, असेही राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.
























































