पैशांसाठी पोलिसात हैवान संचारला; नोकरी मिळाल्याची पार्टी करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण, स्वादुपिंडातून रक्तस्त्राव झाल्यानं मृत्यू

भोपाळमध्ये नोकरी मिळाली म्हणून पार्टी करणाऱ्या तरुणाचा पोलिसांच्या बेदम मारहाणीमध्ये मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. उदित गयाकी (वय – 22) असे मयताचे नाव आहे.

नोकरी मिळाली म्हणून मित्रांसोबत दारूची पार्टी करून घरी येत असताना दोन पोलिसांना त्यांना रोखले आणि 10 हजार रुपयांची मागणी केली. मात्र पैसे न दिल्याने पोलिसांनी उदितला काठीने मारहाण केली. या मारहाणीत उदितच्या स्वादुपिंडाला दुखापत झाली आणि रक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाला.

उदित हा बीटेकचा विद्यार्थी होता आणि नोकरी मिळाल्याच्या आनंदात तो मित्रांसोबत दारू पार्टी करायला गेला होता. रात्री दीडच्या सुमारास घरी येत असताना वाटेत पोलिसांनी त्याला अडवले आणि बेदम मारहाण केली. मारू नका अशी विनंती केल्यावर पोलिसांनी त्याच्याकडे 10 हजार रुपयांची मागणी केली. मात्र एवढे पैसे नसल्याने पोलिसांनी त्याला काठीने मारहाण केली. यात उदितला गंभीर दुखापत झाली होती. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, मारहाणीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर दोन्ही कॉन्स्टेबलला भोपाळ झोन-2चे डीसीपी विवेक सिंह यांनी निलंबित केले. तसेच त्यांच्याविरुद्ध कलम 103 अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, अशी ग्वाही पोलिसांनी दिली.