
देवरुख जवळील सह्याद्रीनगर येथील सजग महिला आरती सत्यवान शिंदे यांनी आपल्या घरी आयोजित केलेल्या हळदीकुंकू समारंभात आलेल्या सर्व महिलांना वाण म्हणून चक्क कोथिंबीरची जुडी देवून पर्यावरण रक्षणाचा आगळावेगळा संदेश दिला.
यासाठी देवरुख जवळील सह्याद्री नगर येथे राहणाऱ्या आरती सत्यवान शिंदे यांना एक अनोखी कल्पना सुचली. आपल्या घरी आयोजित हळदीकुंकू समारंभात पर्यावरण रक्षणाचा आणि प्लॅस्टिकचा वापर न करण्याचा संदेश देण्यासाठी त्यांनी चक्क कोथिंबीरची जुडी देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ही कल्पना त्यांचे पती सत्यवान शिंदे यांनी सांगितली. सत्यवान शिंदे यांनीही या कल्पनेचे स्वागत केले.
हळदीकुंकू समारंभात कोथिंबीर जुडी देण्यासाठी त्यांनी बाजारपेठेत एका व्यापाऱ्याजवळ बोलणी केली आणि घाऊक दरात जवळपास 225 जुड्या खरेदी केल्या. हळदीकुंकू समारंभाच्या दिवशी जवळपास 200 महिला आल्या. वाण म्हणून मिळालेली हिरवीगार कोथिंबीर पाहून सर्वच महिला आनंदीत झाल्या. अशा वेगळ्या उपक्रमाचे महिलांनी स्वागत केल्याचेही आरती शिंदे यांनी सांगितले. ज्या महिला कार्यबाहुल्यामुळे येवू शकल्या नाहित अशा 20 महिलांना शिंदे यांनी कोथिंबीर जुडीचे वाण पाठवून दिले.





























































