कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध कारागृहातून आतापर्यंत 5 हजार 105 बंदिवानांना सोडले

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे विविध कारागृहातील बंदिवानांना संसर्ग होऊ नये म्हणून त्यांना तात्पुरत्या जामीनावर सोडण्यात येत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील छोट्या मोठ्या कारागृहातुन आतापर्यंत तब्बल 5 हजार 105 बंदिवानांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. कारागृह विभागाकडून अजून जवळपास 3 हजार बंदिवानाना टप्याटप्याने सोडले जाणार आहे.

कोरोनामुळे कारागृहात असणाऱ्या बंदिवानांना तात्पुरत्या जामिनावर सोडण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार बंदीवानाना तातडीने पॅरोल आणि तात्पुरत्या जामिनावर सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार राज्यातील विविध कारागृहातून मार्चपासून बंदीवानांना सोडण्यात येत आहेत. त्यानुसार 27 मार्च पासून 2 मेपर्यंत 5 हजार 105 बंदिवान सोडण्यात आले आहेत. मात्र देशविरोधी कारवाया, पोस्को, अंडर ट्रायल आणि शिक्षा भोगणारे कैद्यांना घरी सोडण्यात आले नाही. मात्र, त्यानतरही काही कारागृहात मर्यादेपेक्षा अधिक कैदी असल्याने नवीन बंदीवानांची दुसरीकडे व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातील विविध कारागृहामध्ये बंदी क्षमता 24 हजारावर आहे. परंतु, वेगवेगळ्या गुन्ह्यात जेरबंद केलेल्या जवळपास 35 हजाराहून अधिक बंदीवान कारागृहात आहेत. कोरोनामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार 5 वर्षाखालील शिक्षा असणारे तसेच किरकोळ गुन्ह्यातील कैदी सोडले जात आहेत.

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर संबंधित कैद्यांना पुन्हा त्यांना न्यायालयात बोलविले जाणार आहे. राज्यातील कारागृहातील 8 हजार बंदिवानांना सोडण्यात येणार आहे. आतापर्यंत 5 हजारांवर कैदी सोडण्यात आले असून उर्वरित तीन हजारांवर कैद्यांना जामीनवर सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शिक्षा झालेले कैदीही सोडण्यासाठी कारगृह प्रशासन न्यायालयात प्रयत्न करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या