निर्बंध उठवल्यानंतरही कोरोना नियंत्रणात! आठवडय़ात डबलिंग रेट दोन महिन्यांनी वाढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसह राज्यातील रुग्णसंख्या घटलेल्या जिल्ह्यांत निर्बंध शिथिल करून ‘अनलॉक’ प्रक्रिया सुरू असताना मुंबईमध्ये निर्बंध कमी केल्यानंतरही रुग्णवाढीत घट कायम असल्याची समाधानकारक स्थिती आहे. 5 जून रोजी  511 दिवस असणारा रुग्णवाढीचा दर वाढून 12 जून रोजी 87 दिवसांनी वाढून 600 दिवसांवर गेला आहे, तर रुग्णवाढीचा दर 0.13 टक्क्यांवरून 0.11 टक्क्यांवर आला आहे.

मुंबईसह राज्यभरात कोरोना आता चांगलाच आटोक्यात येत आहे. यामध्ये मुंबईमधील कोरोनाची दुसरी लाट आता पूर्ण नियंत्रणात आल्याने निर्बंधही शिथिल केल्याने जनजीवन सुरळीत होत आहे. मुंबईत सद्यस्थितीत सर्वच पातळ्यांवर कोरोनाच्या स्थितीत सुधारणा होत आहे. यामध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95 टक्क्यांवर पोहोचल्याने सक्रिय रुग्णांची संख्याही झपाटय़ाने कमी होत आहे. आठवडाभरापूर्वी सक्रिय रुग्णांची संख्या 16,133 इतकी होती. यामध्ये घट झाल्याने मुंबईत आता 15,819 सक्रिय रुग्ण राहिले आहेत.

अत्यवस्थ रुग्ण घटल्याने आयसीयू, व्हेंटिलेटर रिक्त!

  • कोरोनामुळे अत्यवस्थ असणाऱया रुग्णांचे प्रमाणही आता वेगाने कमी होऊ लागले आहे. मुंबईत सद्यस्थितीत मुंबईत केवळ 1100 अत्यवस्थ रुग्ण आहेत. त्यामुळे पालिकेकडे उपलब्ध आयसीयू, व्हेंटिलेटर रिक्त राहू लागले आहेत.
  • मुंबईत पालिकेकडे एकूण 2737 आयसीयू आणि 1457 व्हेंटिलेटर आहेत. कोरोनाच्या दुसऱया लाटेत 95 टक्क्यांहून जास्त आयसीयू, व्हेंटिलेटरची गरज लागल्याने अत्यवस्थ रुग्णांची प्रचंड गैरसोय होत होती. मात्र अत्यवस्थ रुग्णांची संख्या घटल्याने 1119 आयसीयू आणि 449 व्हेंटिलेटर रिक्त आहेत.