देशात लॉकडाऊन नाहीच! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्पष्ट संकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत असली तरी न घाबरता, त्याविरुद्ध लढा देऊ. विषाणूचा प्रकार कोणताही असला तरी लसीकरण हाच त्याविरुद्ध लढा देण्याचा प्रभावी मार्ग असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार नाही, असे संकेतही पंतप्रधानांनी दिले.

पंतप्रधानांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. कोरोना महामारी लढाईचे हे तिसरे वर्ष असून आपण ही लढाई जिंकणारच, असा निर्धार पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

स्थानिक पातळीवरच अटकाव, मोठय़ा प्रमाणावर लसीकरण आणि प्रसार रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना या त्रिसूत्रीचे पालन करण्यावर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला.

कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी नागरिकांच्या रोजगाराचा विचार करायला हवा. त्यामुळे स्थानिक पातळीवरच प्रसार रोखण्यावर भर हवा, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

प्रकृतीअस्वास्थ्यामुळे मुख्यमंत्री अनुपस्थित

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृती अस्वास्थ्यामुळे या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्याऐवजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बैठकीत सहभाग घेतला.