
आयपीएलचा उर्वरित मोसम यूएईमध्ये खेळवण्यासाठी बीसीसीआय प्रयत्न करीत आहे. या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयपीएलच्या उर्वरित 31 लढती यूएईत आयोजन करण्यासाठी बीसीसीआयकडून पाऊल उचलण्यात येणार आहे. बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण बैठक 29 मे रोजी होणार आहे. या बैठकीत आयपीएलच्या उर्वरित लढतींच्या आयोजन स्थळाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
30 दिवसांचा कालावधी
बीसीसीआयला आयपीएलच्या उर्वरित लढतींच्या आयोजनासाठी किमान 30 दिवसांचा कालावधी लागणार आहे. हे लक्षात घेऊन बीसीसीआयला इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाशी चर्चा करावीच लागणार आहे. हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यामधील कसोटी मालिकेच्या वेळापत्रकात बदल केल्याशिवाय आयपीएलच्या उर्वरित लढती खेळवण्यात येऊ शकत नाहीत. कारण ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे.
अशाप्रकारे पार पडेल स्पर्धा
15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर हा कालावधी मिळाल्यास बीसीसीआयला आयपीएलच्या उर्वरित लढतींचे आयोजन करता येणार आहे. हिंदुस्थान व इंग्लंड संघांतील खेळाडूंच्या प्रवासासाठी एक दिवस जाणार आहे. दोन्ही देशांतील क्रिकेटपटूंना इंग्लंड येथून यूएईला प्रवास करावा लागणार आहे. प्ले ऑफ लढतींसाठी पाच दिवस राखीव ठेवावे लागणार आहेत. अशा परिस्थितीत बीसीसीआयला 24 दिवसांमध्ये 27 लढती खेळवाव्या लागणार आहेत. या कालावधीत चार वीकेण्ड मिळतील. याचा अर्थ प्रत्येकी आठ शनिवार व रविवारी बीसीसीआयला 16 लढती खेळवता येतील. त्यानंतर उरलेल्या 19 दिवसांमध्ये बीसीसीआयला फक्त 11 लढती खेळवाव्या लागतील.
टी-20 वर्ल्ड कपवर फरक पडायला नको
आयपीएलचा उर्वरित मोसम पार न पडल्यास बीसीसीआयला 2500 कोटींचे नुकसान होणार आहे. त्यामुळे बीसीसीआय आयपीएलच्या आयोजनासाठी प्रयत्न करीत आहे; पण हे करताना बीसीसीआयकडून टी-20 वर्ल्ड कपकडे काणाडोळा व्हायला नको. कारण आयपीएलमध्ये सहभागी होणारे परदेशी क्रिकेटपटू त्यानंतर टी-20 वर्ल्ड कपमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. आयपीएलसाठी टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनावर फरक पडायला नको.
हिंदुस्थान-इंग्लंड कसोटी मालिकेच्या वेळापत्रकात बदल?
आयपीएलच्या उर्वरित लढतींच्या आयोजनासाठी बीसीसीआयकडून यूएई हा पर्याय डोळय़ांसमोर ठेवण्यात आला असला तरी त्यासाठी त्यांना इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डासोबतही बोलणी करावी लागणार आहेत. हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यामधील कसोटी मालिकेच्या वेळापत्रकातही बदल करावे लागणार आहेत. हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यामधील कसोटी मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. दोन देशांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. दुसऱया व तिसऱया कसोटीदरम्यान नऊ दिवसांचे अंतर आहे. हे अंतर चार दिवसांचे केल्यास बीसीसीआयला सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत आयपीएल लढतींचे आयोजन करण्यासाठी पुरेसा अवधी मिळणार आहे.


























































