
सहामाही परीक्षांचे नियोजन सुरू असतानाच मागील दीड वर्षापासून बंद असलेल्या राज्यातील शाळा येत्या 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. शाळा सुरू झाल्यास शिक्षकांसमोर सहामाही परीक्षेचे टेन्शन असणार असून ऑफलाइन तसेच ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. सहामाही परीक्षेच्या मूल्यमापनाविषयी शालेय शिक्षण विभागाकडून शाळांना कोणत्याही सूचना मिळालेल्या नसून या सूचनांची वाट न पाहता मुख्याध्यापकांनी शाळास्तरावर नियोजन आखण्यास सुरुवात केली आहे.
प्रत्यक्ष शाळा सुरू होणार असल्या तरी विद्यार्थ्यांवर शाळेत येण्याची सक्ती करता येणार नाही. पालकांनी संमतीपत्र दिल्यास विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे शाळेत न येणाऱया विद्यार्थ्यांच्या ऑफलाइन वर्गासोबतच ऑनलाइन परीक्षाही घ्यावी लागणार आहे. अद्याप अनेक विद्यार्थी शाळेच्या संपर्कात नाहीत तर काही जण आपल्या मूळ गावी आहेत. दिवाळी करूनच विद्यार्थी मुंबईत परतणार असल्याने प्रथम सत्रात वर्ग सुरू करण्याऐवजी दुसऱया सत्रात दिवाळीनंतर शाळा सुरू करावी, अशी मागणी पालकांकडून होत असल्याचे शिक्षक जयवंत पुलकर्णी यांनी सांगितले. प्रत्येक शाळेने आपापल्या स्तरावर सहामाही परीक्षांचे आयोजन केले आहे. 40 गुणांची लेखी तर 40 गुणांची तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना व्हॉट्सअॅप ग्रुपवर किंवा गुगल क्लासरूमवर प्रश्नपत्रिका पाठविण्यात येणार असून उत्तरपत्रिका शाळेत जमा करायची आहे.
विद्यार्थ्यांना लेखी परीक्षांचे मार्गदर्शन नाही
ऑनलाइन शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना लेखी परीक्षांचे मार्गदर्शन नाही. 4 ऑक्टोबरला शाळा सुरू झाल्यास फार कमी दिवसांत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाशिवाय लेखी स्वरूपातील सहामाही परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. राज्य सरकारने प्रथम सत्रात घाई न करता दिवाळीनंतर शाळा उघडण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी टीचर्स डेमोव्रॅटिक फ्रंटचे उपाध्यक्ष राजेश पंडय़ा यांनी केली आहे.


























































