
कोरोना व्हायरसमुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. महाराष्ट्रात कोरोनाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेला नाही असे सांगत खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी स्वच्छ रुमाल वापरावा, काही काळ हस्तांदोलन (हॅण्डशेक) टाळावे, असा सल्ला सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी विधान परिषदेत दिला. जगभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण केवळ अडीच ते तीन टक्के असून या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
कोरोना व्हायरसबाबत बुधवारी विधान परिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून केलेल्या उपययोजना आणि नागरिकांनी घ्यायच्या काळजीबाबत सविस्तर माहिती दिली. मुंबईत कस्तुरबा, राजावाडी, कुर्ला, वांद्रे, बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर येथे विलगीकरण कक्षाची सुविधा करण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये दहा खाटांचे विलगीकरण कक्ष तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या वतीने डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येत असून 6 मार्चला त्याचे पहिले सत्र दिल्ली येथे होणार आहे. राज्यातील काही डॉक्टर त्यात सहभागी होणार असून त्यांच्या माध्यमातून राज्यातील अन्य डॉक्टरांना प्रशिक्षित केले जाईल. राज्यात पर्सनल प्रोटेक्शन कीट, एन-95 मास्क, ट्रिपल लेअर मास्क ही आवश्यक साधनसामुग्री मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. विमानतळ, जहाजातून येणाऱ्या प्रवाशांचे 100 टक्के थर्मल क्रिनिंग होत आहे. बाधित देशांतून आलेल्या व्यक्तींची यादी तयार केली जात आहे. त्यांच्याशी आपल्या व्यक्ती 28 दिवस संपर्कात राहतात. मास्कची साठेबाजी आणि वाढीव दराने विक्री केली जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. या चर्चेत उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांच्यासह प्रकाश गजभिये, शरद रणपिसे, प्रवीण दरेकर, हेमंत टकले, महादेव जानकर, प्रशांत परिचारक, रणजित पाटील, मनीषा कायंदे, नीलय नाईक, विलास पोतनीस, भाई गिरकर, हुस्नबानू खलिफे, विद्या चव्हाण, जगन्नाथ शिंदे सहभागी झाले.
कोरोना प्राणिजन्य आजार
कोरेनाला कोविड 19 असे नाव दिलेले आहे. कोरोना हा ग्रुप ऑफ व्हायरस आहे. मागे जे व्हायरस येऊन गेले त्यातीलच हा एक आहे, मात्र याचा उगम समजलेला नाही. सार्स, मर्स, स्वाइन फ्लू आजाराप्रमाणे हा प्राणिजन्य व्हायरस असल्याचा अंदाज लावला जात आहे आणि तो 100 टक्के खरा आहे. कारण चीनमध्ये 120 प्रकारचे प्राणी खाल्ले जातात. मटण मार्केटमध्ये जे लोक गेले होते तिथल्या लोकांना याची लागण झालेली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. नागरिकांनी कच्चे, अर्धवट शिजवलेले अन्न खाऊ नये. चांगले अन्न खावे, असे आवाहन टोपे यांनी केले.
अफवा पसरविल्यास कडक कारवाई
या विषाणूच्या प्रतिबंधासाठी नागरिकांची जाणीवजागृती करण्याकरिता मोठय़ा प्रमाणावर मोहीम हाती घेण्यात येत आहे. त्यामध्ये बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग, दृश्राव्य माध्यमांवर जाहिराती, चित्रपटगृहांमधून संदेश प्रसारण आदी उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. कोरोना व्हायरसबाबत समाज माध्यमात चुकीची माहिती पसरवली जात आहे. कोणी म्हणते चिकन खाल्यावर होतो, कोणी म्हणते फळ विशेषतः ड्रगन फ्रूट खाल्ल्यावर कोरोना होतो. ज्याला जी कल्पना सुचेल ती समाज माध्यमात पसरवीत आहेत. अशा मेसेजेसला आळा घालण्यासाठी सायबर क्राइमच्या महासंचालकांशी चर्चा केली आहे. अशा मेसेजसच्या मुळाशी जाऊन अफवा पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.























































