
रक्तदात्यांनी कोरोनाच्या धसका घेऊन रक्तदान करणे बंद केल्याने मुंबईत रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या मुंबईतील विविध रक्तपेढ्यांमध्ये केवळ आठ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक असल्याने पुढील काळात रक्ताची गरज निर्माण झाल्यास गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य रक्त संक्रमण परिषदेने रक्तसाठा वाढवण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यापासूनच अनेक ठिकाणी होणारे रक्तदान कमी होण्यास सुरुवात झाली. यामध्ये 24 मार्चपासून देशभर लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर रक्तदात्यांची संख्या आणखीनच कमी झाली आहे. कोरोना संसर्गाच्या धोक्यामुळे सामाजिक संस्थांकडून आयोजित करण्यात येणारी रक्तदान शिबिरेही बंद झाल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोनाचा प्रभावामुळे मुंबईत विविध रुग्णालयांत अनेक शस्त्रक्रिया पुढेकलण्यात आल्या आहेत. या शस्त्रक्रिया पुढे ढकलून दीड महिना उलटून गेला आहे. त्यामुळे या प्रलंबित ठेवलेल्या शस्त्रक्रिया लवकरच कराव्या लागणार आहेत. त्यामुळे रक्ताची गरज मोठ्या प्रमाणावर भासू शकते. त्यामुळे पालिका, सरकार आणि सामाजिक संस्थांनी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
समाजिक संस्था, मंडळांना परिषदेचे आवाहन
कोरोनाच्या प्रभावामुळेच रक्तदानात घट होऊन तुटवडा निर्माण झाल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सद्यस्थिती रक्तदानात अनेक अडथळे आहेत. मात्र आगामी काळातील रक्ताची निर्माण होणारी गरज पाहता सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे आणि गृहनिर्माण सोसायट्यांना रक्तदान करण्यासाठी आवाहन करण्यात येत असल्याचेही परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून रक्त गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात रस्त तुटवडा असल्यामुळे इच्छुक संस्थांनी सोशल डिस्टंन्सिंग पाळून पाच ते दहा जणांचे गट करून रक्तदान शिबिरे आयोजित करावीत असे आवाहनही राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांमुळे एप्रिलमध्ये तुटवडा जाणवला नाही
रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आवाहन केल्यामुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे घेण्यात आली. त्यामुळेच एप्रिल महिन्यात रक्ताचा तुटवडा जाणवला नाही. त्यामुळेच एप्रिल महिन्यात तुटवडा जाणवला नसल्याचे परिषदेकडून सांगण्यात आले. मे, जून महिन्यांत सुट्ट्यामुळे दरवर्षीच रक्ताचा तुटवडा जाणवतो. मात्र यावर्षी कोरोनाच्या प्रभावामुळेच हा तुटवडा निर्माण झाल्याचेही परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



























































