
दादर, माहीम आणि धारावीत येणाऱया पालिकेच्या जी/उत्तर प्रभागातील कोरोना सेंटर्संमध्ये आता मानसिक बळ वाढवण्यासाठी महापुरुषांच्या आयुष्यातील काही प्रसंग आणि त्यावर त्यांनी संयमाने केलेली मात याची ओघवती गोष्ट सांगण्यात येणार आहेत. दादरच्या ब्राह्मण सेवा मंडळातील कोरोना केंद्रात याची आजपासून सुरुवात झाली असून पहिल्या गोष्टीरूपी व्याख्यानात रुग्णांच्या मदतीला छत्रपती शिवाजी महाराज धावून आले आहेत.
कोरोना झालेल्या रुग्णांना जलद गतीने कोरोनामुक्त करण्यासाठी पालिकेच्या जी/उत्तर विभागात आता महापुरुषांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगाला संयमाने, धीराने, न खचता कसे तोंड दिले आणि त्यावर कशी मात केली, याची ओघवती गोष्ट व्याख्यानाच्या रूपाने ऐकवली जात आहे. यात शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या महापुरुषांचा समावेश आहे. हळूहळू अनेक महापुरुषांच्या गोष्टींचा यात समावेश करण्यात येणार आहे. स्वतः कोरोना रुग्ण असलेल्या कौस्तुभ वीरकर यांनी अशा गोष्टरूपी व्याख्यानाची सुरुवात केली असून त्यामुळे इतर रुग्णांचे मानसिक बळ वाढवत आहे. महापुरुषांच्या गोष्टीरूपी व्याख्यानाचे प्रयोग इतरही कोरोना केंद्रांवर सुरू करण्यात येणार आहे, यात रुग्णच एकमेकांना कोरानामुक्त करण्यासाठी पुढाकार घेतील, अशी माहिती सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.
सगळ्यांच्या लहानपणी आई-वडिलांनी केलेल्या संस्काराबरोबरच महापुरुषांनी गाजवलेले शौय, कठीण प्रसंगांना संयम, धीराने दिलेले तोंड यांचेही संस्कार झालेले असतात. मात्र, मोठेपणी दगदगीच्या जीवनात याचा विसर पडतो. कोरोना संकटाच्या या काळात कोरोना रुग्णांच्या मनाला पुन्हा उभारी देण्यासाठी महापुरुषांच्या व्याख्यानरूपी गोष्टींतून संयमाने कठीण प्रसंगावर मात करता येते, हे मनावर बिंबवण्यासाठी हा प्रयोग करण्यात येत आहे.’
– डॉ. शुभांगी कांबळे, ब्राह्मण सेवा मंडळ, कोरोना सेंटर्स व्यवस्थापक

























































