मुंबईतील कोरोना ‘हॉटस्पॉट’ नियंत्रणात; वांद्रेनंतर भायखळा, कुर्ला, माटुंग्याची स्थिती सर्वोत्तम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेच्या माध्यमातून मुंबईत कोरोना रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांमुळे ‘हॉटस्पॉट’ ठरलेले विभाग आता नियंत्रणात आले आहेत. यामध्ये वांद्रे येथील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 88 दिवसांवर गेला असून त्यानंतर माटुंगा 82 दिवस, भायखळा 74 दिवस आणि कुर्ला वॉर्डमध्ये डबलिंग रेट 70 दिवसांपर्यंत वाढला आहे. तर मुंबईचा सरासरी डबलिंग रेट 39 दिवसांवर गेला आहे.

कोरोना फैलावाच्या सुरुवातीच्या काळात एच पूर्व म्हणजेच वांद्रे पूर्व, ई वॉर्ड म्हणजेच भायखळा, एफ उत्तर म्हणजेच माटुंगा आणि एल वॉर्ड म्हणजेच कुर्ला विभागात दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत होते. दाटीवाटीच्या वस्तीमुळे या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णाच्या जवळच्या निकट संपर्क वाढल्यामुळे रुग्णसंख्या वाढत होती. मात्र, पालिकेच्या ‘चेस द व्हायरस’ मोहिमेत प्रत्येक रुग्णामागे 15 जणांना क्वॉरंटाइन करणे, निर्जंतुकीकरण मोहीम राबवून कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे आता हॉटस्पॉटमधील स्थिती नियंत्रणात आली आहे. या ठिकाणचा डबलिंग रेट वाढला असून आठवड्याची सरासरी वाढही कमी झाली आहे. यामध्ये वांद्रे येथील सरासरी वाढ सर्वात कमी म्हणजे 0.8 टक्के असून भायखळा आणि माटुंगा 0.9 तर कुर्ला विभागची सरासरी वाढ 1 टक्क्यावर आली आहे.

आठ वॉर्डमध्ये सरासरी वाढ 1.5 टक्के
रुग्णवाढ नियंत्रणात आल्यामुळे पालिकेच्या 24 वॉर्डपैकी 10 वॉर्डमध्ये आठवड्याची सरासरी रुग्णवाढ 2 टक्क्यांपर्यंत खाली आहे. यामध्ये आठ विभाग तर दीड टक्क्यांपेक्षा कमी वाढ असलेले आहेत. यामध्ये जी नॉर्थ आणि जी साऊथ 1.3 टक्के, एम वेस्ट आणि बी 1.2 टक्के तर ए आणि एम ईस्ट वॉर्डची सरासरी वाढ 1.1टक्के अशी वाढ आहे.