कराडच्या घारेवाडीत 16 जण कोरोनाबाधित; प्रशासनाने केले गावात लॉकडाऊन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कराड तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याची भीती व्यक्त होत असून, घारेवाडी येथे 16 रुग्ण कोरोनाबाधित आढळल्याने संपूर्ण गाव प्रशासनाने लॉक केले आहे. बाधित रुग्णांवर घरीच उपचार करण्यात येत असून गावातील अन्य शंभर जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. या घटनेने कराड तालुक्यात भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे शनिवारी व रविवारी घारेवाडीची यात्रा होती. यामुळे रुग्ण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याने उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी सोमवारी सकाळी खबरदारीचा उपाय म्हणून घारेवाडी लॉक करण्याचे आदेश काढले. आरोग्य विभागाने तातडीने बाधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांचे नमुने घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे. पोलिस प्रशासनाने घारेवाडी येथील अंतर्गत सर्व रस्ते बंद केले असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. इंदोली येथे नव्याने चार रुग्ण आढळले आहेत. तर दुसऱ्या गावातही एक- दोन रुग्ण नव्याने आढळून येत आहेत.