चाळी-झोपडपट्टय़ांपेक्षा इमारतींमध्येच कोरोना वाढतोय

मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णवाढ होत असून चाळी-झोपडपट्टय़ांपेक्षा इमारतींमध्येच कोरोना वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिकेने नियमांच्या कठोर अंमलबजावणीस सुरुवात केली असून गेल्या आठ दिवसांत इमारतींमधील तब्बल एक हजार मजले सील केले आहेत. त्यामुळे आता मुंबईत इमारतींमधील सील मजल्यांची संख्या 2016 वर पोहोचली असून 145 इमारती संपूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत. याच वेळी चाळी-झोपडपट्टय़ांमध्ये केवळ 11 कंटेनमेंट झोन आहेत. यामुळे मुंबईत सद्यस्थितीत एकूण 1 लाख 63 हजार घरांमधील तब्बल 6 लाख 47 हजार मुंबईकर प्रतिबंधात आहेत.

मुंबईत पूर्णपणे आटोक्यात आलेला कोरोना फेब्रुवारीच्या मध्यावर पुन्हा वाढू लागल्याने पालिकेचे आव्हान वाढले आहे. फेब्रुवारीअखेरीस तर ही संख्या एक हजारावर गेली होती. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून कोरोना पुन्हा नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली असून एक हजारापेक्षा कमी रुग्णसंख्या नोंदवली जात आहे. मात्र जानेवारीअखेर 334 पर्यंत आलेली रुग्णसंख्या पुन्हा हजारांपार नोंदवली जाऊ लागल्याने पालिकेने प्रभावी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये विभागात पालिकेच्या माध्यमातून कोरोना जनजागृती, तपासणी आणि चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. दैनंदिन चाचण्यांचे प्रमाण 18 हजारांपर्यंत वाढवण्यात आले आहे. शिवाय याआधी एखाद्या मजल्यावर दहा रुग्ण आढळले तर इमारत सील करण्यात येत होती, तर आता पाच रुग्ण आढळले तरी संपूर्ण इमारत सील करण्यात येत असून 2 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास मजला, इमारतीचा भाग प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात येत आहे.

मास्कशिवाय फिरणाऱयांविरोधात 47 लाखांची सर्वात मोठी कारवाई

  • कोरोना रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क वापरला नाही तर 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात येत आहे. पालिकेच्या माध्यमातून 4800 मार्शल, प्रत्येक रेल्वे लाइनवर 100 याप्रमाणे 300 आणि पोलिसांच्या माध्यमातून ही कारवाई केली जात आहे.
  • या कारवाईत 1 फेब्रुवारी रोजी विक्रमी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पालिकेने 14 हजार 983 जणांवर कारवाई करून 29 लाख 96 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत 7988 जणांवर कारवाई करून 15 लाख 97 हजार 600 रुपयांची कारवाई केली आहे.
  • रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर 495 जणांवर कारवाई करण्यात आली असून 99 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या एकाच दिवशी 23 हजार 466 जणांवर कारवाई करण्यात आली असून तब्बल 46 लाख 93 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आतापर्यंत एकाच दिवसात झालेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.
आपली प्रतिक्रिया द्या