
कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली आंतरराष्ट्रीय विमान सेवा रविवारपासून सुरू झाल्याचे केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री जोतिरादित्य शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे हिंदुस्थान थेट 40 देशांशी जोडला जाणार आहे. उन्हाळय़ाच्या पार्श्वभूमीवर 135 नव्या विमान वाहतूक सेवा सुरू केल्या असून त्याचे आज शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. जगभरात कोरोनाचा उद्रेक झाल्याने केंद्र सरकारने मार्च 2020 मध्ये नियमित आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीवर निर्बंध आणले होते. मात्र कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आजपासून नियमितपणे विमान सेवा सुरू केली आहे. त्यानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर विमान सेवा पुरवणाऱया 60 कंपन्यांनी वेळापत्रक मंजुरीसाठी अर्ज केले आहेत. त्यामध्ये मलेशिया, थायलंड, तुर्की, अमेरिका, इराकसाठीच्या 1783 उड्डाणांना परवानगी दिली आहे. तसेच अनेक नवीन विमान कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी परवानगी मिळावी म्हणून ‘डीजीसीए’कडे परवानगी मागितली आहे.























































