जेईई-मेन परीक्षा ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेली एप्रिल आणि मे सत्रातील जेईई-मेन परीक्षा येत्या ऑगस्टमध्ये घेतल्या जाण्याची शक्यता आहे. चालू महिनाअखेरीपर्यंत राष्ट्रीय चाचणी संस्था (एनटीए) या परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर करणार आहे.

यंदाच्या वर्षीपासून जेईई-मेन परीक्षा वर्षातून चारवेळा घेतली जाणार आहे. यावर्षी फेब्रुवारी आणि मार्च सत्रातील जेईई-मेन परीक्षा घेण्यात आल्या, परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एप्रिल आणि मे सत्रातील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. आता त्या ऑगस्टमध्येच घेण्यात येतील असे सांगितले जात आहे. या दोन सत्रांतील जेईई परीक्षा 20-25 दिवसांच्या अंतराने घेतल्या जाण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.

कोरोनामुळे यंदाची जेईई-अॅडव्हान्स्ड परीक्षाही रद्द करून 3 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे, परंतु जेईई-मेन परीक्षांच्या निकालानंतरच ती घेतली जात असल्याने तीसुद्धा ऑगस्टनंतरच होईल असे सांगण्यात येते. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱया ‘नीट’ परीक्षेच्या तारखेकडेही विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.