ठाण्यातील कोरोग्रस्तांच्या यादीत पत्रकार, मंत्र्यांचे बॉडीगार्ड; 29 नवीन रुग्णांची भर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाग्रस्तांच्या यादीमध्ये आता पत्रकार आणि मंत्र्यांच्या बॉडीगार्डचाही समावेश झाल्यामुळे आरोग्ययंत्रणेसह ठाणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या 48 तासांमध्ये कोरोनाच्या तब्बल 29 नवीन रुग्णांची भर पडली असून रुग्णांचा आकडा 76 च्या घरात पोहचला आहे. धक्कादायक म्हणजे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण ठाणे पालिका क्षेत्रात आढळले आहेत. घरी रहा, बाहेर पडू नका असे आवाहन करणाऱ्या मंत्र्यांच्या घराच्या दारापर्यंत कोरोना येऊन पोहचल्यामुळे ठाणेकरांनो आतातरी शहाणे व्हा अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याचा समावेश रेड झोनमध्ये झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 240 कोरोना बाधित आढळले असून त्यापैकी 11 जणांचा बळी गेला आहे. प्रशासनाने दिलेल्या आकेडवारीनुसार ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आतार्यंत सर्वाधिक 76 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाची लागण झालेल्यांच्या संख्येत झपाट्याने भर पडत आहे. नौपाडा येथे एका डॉक्टरला आणि त्याच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर आता त्याच्या पत्नी व मुलीलाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या रुग्णालयात काम करणाऱ्या नर्स व वॉर्डबाय अशा 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले.

चिंतेची बाब म्हणजे आतापर्यंत कोरोना प्रार्दुभावाच्या तसेच त्यासंबधित बातम्यांचे वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांनाही त्याची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. ठाण्यातील दोन पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याने पालिकेने मुख्यालयातील पत्रकारकक्ष सील केला आहे. तर सोमवारी दिवसभर 39 पत्रकारांची कोरोनाची चाचणी झाली असून ही मोहिम आणखी काही दिवस सुरू ठेवण्यात येणार आहे. सोमवारी चाचणी झालेल्यांमध्ये सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सुटकेचा निश्वास सोडण्यात आला आहे. मात्र, त्याचवेळी काळजी वाढवणारी बाब समोर आली आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ड्रायव्हरसह सुरक्षारक्षक अशा 14 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आव्हाड त्यांच्या कळवा, मुंब्रा मतदारसंघात जनजागृतीसह मदतकार्यासाठी फिरत आहेत. यादरम्यान त्यांच्या अंगरक्षक, सुरक्षारक्षक तसेच ड्रायव्हरला लागण झाली असावी असा अंदाज आहे. त्यामुळे आता जितेंद्र आव्हाड यांनीही स्वतःला होम क्वारंटाईन केले आहे. दरम्यान आकडेवारीनुसार चरई येथे तबलिगी जमातच्या एकाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय वाघबीळ, कौसा, खारेगाव, ढोकाळी येथेही कोरोनाचे रुग्ण सापडले असल्याची माहिती पालिकेने दिली.

जिल्ह्यातील पालिकानिहाय रुग्ण

पालिका                          रुग्ण

  • ठाणे                               76
  • कल्याण- डोंबिवली               55
  • नवीमुबंई                         50
  • उल्हासनगर                       1
  • भिवंडी                            1
  • अंबरनाथ                         3
  • बदलापूर                         4