सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या 30 वर; 5 रुग्णांची वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापुरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मंगळवारी 5 ने वाढ झाली असून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 30 वर पोहचली आहे. त्यातील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 27 जणांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. मंगळवारी आढळलेल्या पाच रुग्णांपैकी मोदी नगर, शास्त्रीनगर झोपडपट्टी, जोशी गल्ली हैदराबाद रोड ,शनिवार पेठ, मदर इंडिया झोपडपट्टी येथील आहेत.आतापर्यंत सोलापुरात 851 कोरोना संशयितांचे स्वॅब घेण्यात आले. यातील 654 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून यात 624 निगेटिव्ह तर 30 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यातील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात लागू असलेल्या संचारबंदीला दुसऱ्या दिवशीही शहराच्या विविध भागात चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते. मात्र, काही ठिकाणी विनाकारण काही लोक फिरत होते. त्यांना पोलिसांनी समज दिली. संचारबंदी आणि लॉकडाऊन काळात सोलापूर शहर पोलिसांनी सरकारी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत 3 हजार 790 व्यक्तींविरुद्ध 2000 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परवानगी नसतानाही मोटारसायकल आणि अन्य वाहनांचा वापर केल्याप्रकरणी आतापर्यंत शहरात 5005 मोटरसायकल रिक्षा आणि मोटार कार अशी वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे. सोलापूर ग्रामीण हद्दीतही पोलिसांनी अशीच मोठ्याप्रमाणावर कारवाई केली आहे. त्यांनी जप्त केलेल्या वाहनांची संख्या पाच हजाराच्या पुढे आहे.