कोरोनाची दुसरी लाट; अहमदाबादमध्ये शुकशुकाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजधानी दिल्लीत पुन्हा थैमान माजविणाऱया कोरोनाने गुजरातमध्येही परत आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. त्याचा सर्वाधिक फटका व्यापाराचे मोठे केंद्र असलेल्या अहमदाबाद शहराला बसला आहे.

शुक्रवारी रात्री 9 वाजल्यापासून सकाळी 6 या वेळेत अहमदाबाद शहरात कर्फ्यू लावण्यात आला आहे. हि संचारबंदी सोमवार सकाळी 6 वाजेपर्यंत लागू असेल. त्यामुळे गुजरातचे हे व्यापारी शहर पार सुनसान आणि निर्मनुष्य झाल्याचे चित्र शहरातील रस्त्यांवरील वातावरणाने दिसत आहे. मंदिरे, मशिदी आणि धार्मिक स्थळेही बंद ठेवण्यात आली आहेत.

कोरोना कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादच्या संवेदनशील भागांत पोलीस गस्त घालत आहेत. संचारबंदीचा नियम मोडणाऱया नागरिकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश शहर प्रशासनाने पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे शहराच्या एसजी हायवे, आश्रम रोड, लाल दरवाजा, कालूपूर, बापूनगर, नरोडा, सरखेज, रिंग रोड, नॅशनल हायवेला जोडलेले रस्ते, शाहपूर, असारवा, साबरमती, चांदखेडा भागांना पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. शहरात तपासणी केल्याशिवाय पुणालाही प्रवेश दिला जात नाहीय.

दुसऱ्या शहरातून येणाऱ्यांवर बंदी नाही

अहमदाबादेत संचारबंदीदरम्यान अवजड वाहने आणि बस ,ट्रक यांच्या प्रवेशावर बंदी आहे. मात्र परगावाहून शहरात येणाऱया बसेस शहराच्या प्रवेशद्वारावर रोखले जात आहे. त्यातील प्रवाशांना स्थानिक बसेसमधून इच्छित स्थळी पोचवले जात आहे.

दुसऱ्या शहरातून अहमदाबादमध्ये येणाऱया खासगी वाहनांना तपासणीनंतर कर्फ्यूचे नियम पाळत शहरात प्रवेश दिला जात आहे. रेल्वे व अहमदाबादवरून प्रवास करणाऱया प्रवाशांना सूट देण्यात आली आहे. बाहेरगावाहून येणाऱया प्रवाशांना घरी सोडण्यासाठी एसटी बसेसची व्यवस्था राज्य सरकारने केली आहे.

अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांना सूट

अहमदाबादमधील संचारबंदीच्या काळात दूध, जीवनावश्यक वस्तू, औषधे, पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅस, पाणीपुरवठा करणारे कर्मचारी, डॉक्टर्स, पत्रकार यांना त्यांच्या कामासाठी शहरात फिरण्याची सूट देण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी मागणी केल्यास त्यांना आपले ओळखपत्र सुरक्षा कर्मचाऱयांना दाखवावे लागत आहे.