हिंदुस्थानात कोरोनाची दुसरी लाट येणार का?…या आहेत शक्यता…

1765

कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. जगभरात आतापर्यंत 81 लाख व्यक्ती कोरोनाबाधित आहेत. तर 6 लाख 90 हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हिंदुस्थानातही कोरोनाचा कहर सुरू आहे. हिंदुस्थानात 24 तासात 50 हजार नवे रुग्ण आढळत आहेत. देशातील कोरोनाबाधितांची संख्या 18 लाखांच्यावर गेली आहे. तर मृतांचा आकडा 39 हजारांवर गेला आहे. देशात कोरोनाचा कहर सुरू असतानाच देशात समूह संसर्ग नसल्याचे किंवा कोरोनाची लाट आली नसल्याचे सांगण्यात येत आहे. हिंदुस्थानातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता तज्ज्ञांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत काही शक्यता व्यक्त केल्या आहेत.

हिंदुस्थानातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत आता कोणतीही ठोस शक्यता व्यक्त करता येणार नाही, असे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले. मात्र, देशातील भौगोलिक परिस्थिती आणि वातावरणानुसार काही राज्यातील ठराविक भागात कोरोनाचे छोट्या-मोठ्या स्वरूपातील उद्रेक वारंवार होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. कोरोनाचा कहर वाढत असल्याने जगभरातील परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. प्रत्येक देशातील भौगोलिक परिस्थिती आणि वातावरण भिन्न असल्याने कोरोना संक्रमणाचे प्रमाण आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वेगवेगळे आहे. कोरोना हा नवा विषाणू असून त्याच्या फैलावाबाबत अधिक माहिती नाही. तसेच यावर औषधे किंवा लस उपलब्ध नसल्याने कोरोना फेलावाच्या लाटेबाबत कोणतीही शक्यता वर्तवणे कठीण आहे.

हिंदुस्थानातही वेगवेगळ्या राज्यात कोरोना संक्रमणाच्या प्रमाणात खूप खरक आहे. काही राज्यातील ठरावीक भागात हा झपाट्याने फैलावला. तर काही भागात याचा वारंवार उद्रेक दिसून आला. त्यामुळे देशभरासाठी एकच शक्यता वर्वणे कठीण असल्याचे भार्गव म्हणाले. देशातील सध्याची स्थिती बघता काही राज्यात आणि काही भागात कोरोनाचा वारंवार उद्रेक होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. जगातील काही देशात कोरोनाची दुसरी लाट येत आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत कोरोना फैलाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी केलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच स्वच्छता आणि सुरक्षा याकडे प्रत्येकाने लक्ष दिल्यास कोरोनाच्या फैलावास पायबंद बसेल, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या