
कोरोना प्रतिबंधक लस टोचल्यानंतर या लशीचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहेत. लसीकरणानंतर त्रास झाल्याने नगरमधील तीन आरोग्यसेविका आणि सोलापुरातील सातजणांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
देशभरात कालपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र, लसीकरणानंतर नगर महापालिकेच्या दोन आणि जिल्हा रुग्णालयातील एका परिचारिकेला थंडी-ताप, डोकेदुखी, मळमळणे, उलटी होणे, थकवा जाणवणे असा त्रास सुरू झाला. महापालिकेच्या एका परिचारिकेला मध्यरात्री आणि दुसरीला आज पहाटे तसेच जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेविकेला आज सकाळी त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
लसीकरण केल्यानंतर तीनजणांना त्रास झाला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, घाबरण्याचे काहीही कारण नाही. अत्यंत किरकोळ प्रकारची रिऍक्शन आहे. तिघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे नगर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी सांगितले.
सोलापूर शहर व जिह्यात 11 ठिकाणी शनिवारपासून कोरोनाची लस देण्यात येत आहे. शनिवारी कुंभारी येथील अश्विनी वैद्यकीय महाविद्यालय येथे कार्यरत असलेल्या नर्सिंग स्टाफला साडेअकरा ते बाराच्या सुमारास लस टोचण्यात आली. लस दिल्यानंतर काहीजणांना चक्कर, ताप आल्याचे दिसून आले. अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. यात चार पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे. या रुग्णांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे, असे वैद्यकीय महाविद्यालयतील सूत्रांनी सांगितले. सात रुग्णांना त्रास जाणवल्यामुळे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत असून, प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. करजखेडकर यांनी सांगितले.
या रुग्णांच्या नातेवाइकांनी रुग्णालयातील कार्यपद्धतीवर आरोप केला असून, लस दिल्यानंतर व आयसीयूत दाखल केल्यानंतर कुटुंबीयास माहिती देण्यात आली
नाही. केसपेपर व आय. डी. प्रूफही घेतले नसल्याचे सांगितले. दरम्यान, अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयाला जिल्हा आरोग्य अधिकारी व प्रांत शिंदे यांनी भेट देऊन माहिती घेतली आहे.
नगर जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभाग
लस टोचून घेतल्यानंतर त्रास होणाऱया रुग्णांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. तेथे 12 बेडची सुविधा आहे. एक वैद्यकीय अधिकारी आणि पाच कर्मचारी येथे कार्यरत राहतील. दर तासाला ते रिपार्ंटग करतील, अशा सूचना जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिल्या आहेत. परिस्थिती आणखी गंभीर झाल्यास बेड वाढविण्यात येतील, असे जिल्हा रुग्णालयातून सांगण्यात आले.



























































