अमेरिकेत हाहा:कार, एका दिवसात 865 जणांचा मृत्यू

1424

जागतिक महासत्ता म्हणवणारा अमेरिका देश डोळ्यांना न दिसणाऱ्या विषाणूपुढे गुडघे टेकता झालाय. या विषाणूचा अमेरिकेत इतक्या मोठ्या प्रमाणावर फैलाव झालाय की त्याला रोखायचं कसं हा प्रश्न तिथल्या अतिप्रगत तंत्रज्ञानाचा अभिमान असणाऱ्या तज्ज्ञांना पडला आहे. एका दिवसात कोरोनामुळे 865 जणांचा मृत्यू झाला असून 9/11 च्या अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांपेक्षा जास्त जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. तिथली परिस्थिती आणखी गंभीर होत जाणार आहे, कारण तसा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

मंगळवारी ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस येथून त्यांच्या देशवासीयांशी संवाद साधला. यामध्ये ते म्हणाले की येणारे दोन आठवडे हे अत्यंत वेदनादायी असतील. यासाठी आपण सगळ्यांनी तयार रहायला पाहिजे. सध्या जी परिस्थिती आहे त्याहीपेक्षा वाईट परिस्थिती आपल्यावर पाहण्याची वेळ येऊ शकते. ट्रम्प यांनी या आजारामुळे हजारो लोकांचा मृत्यू होत असून हा आकडा वाढत जात असल्याचं म्हटलंय. सध्या ज्या वेगाने कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होत आहे आणि ज्या उपाययोजना केल्या जात आहेत त्या पाहता अमेरिकेत किमान 1 ते दीड लाख लोकांचा मृत्यू होईल असा अंदाज व्हाईट हाऊसमधील तज्ज्ञ मंडळींनी लावल्याचे बोलले जात आहे. यामुळेच ट्रम्प यांनी पुढचे दोन आठवडे हे वेदनादायी असतील असं म्हटल्याचं बोललं जात आहे.

बुधवारी सकाळी मिळालेल्या आकड्यांनुसार अमेरिकेत 1 लाख 88 कोरोनाग्रस्त सापडले आहेत. या आजारामुळे 3883 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दीड लाख लोकांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय असून त्यांच्या चाचण्या सध्या सुरू आहेत.

जॉन हॉपकीन्स संशोधन केंद्राने कोरोनासंदर्भात त्यांचे स्वत:चे संशोधन पूर्वीच सुरू केले असून त्यांनी जमवलेल्या माहितीमध्ये जगभरात आतापर्यंत या आजाराने 40 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम युरोप आणि अमेरिकेत एका दिवसामध्ये या आजारामुळे सर्वाधिक बळी गेल्याचं संशोधनात दिसून आलं आहे. अमेरिकेत 865 बळी गेले आहेत तर स्पेनमध्ये 24 तासात 849 बळी गेले आहेत.

जर्मनीमध्ये 67,051 कोरोनाग्रस्त असून तिथे आतापर्यंत किमान 650 जणांचा बळी गेला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 8 लाखाच्या पलिकडे पोहोचल्याचं इथल्या संशोधकांचं म्हणणं आहे. चीनमध्ये उद्रेकाला दाबण्यात यश आल्याचं दिसत असल्याचंही संशोधनातून दिसून आलं आहे. पूर्वी या आजाराचा केंद्रबिंदू हा चीन होता, त्यानंतर तो इटली झाला आणि आता हा केंद्रबिंदू अमेरिका होण्याची शक्यता असल्याचं या संशोधनातून दिसून आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या