Corona Virus – परीक्षा केंद्र परिसरातील गर्दीमुळे जिल्हा प्रशासन चिंतेत

421

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य शासनाने योग्य ती खबरदारी घेतलेली आहे. गर्दी करणं टाळावं यासाठी शासनाने जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाय अंमलात आणले आहेत. असं असलं तरी सध्या चालू असलेल्या दहावीच्या परीक्षांमुळे केंद्राबाहेर विद्यार्थी आणि पालकांची गर्दी कशी टाळायची यावरून जिल्हा प्रशासन अजूनही चिंतेत आहे. बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार , जिल्हाशल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात, जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ राधाकिसन पवार हे या जीवघेण्या आजाराची सर्वसामान्यांना लागण होऊ यासाठी दिवस रात्र मेहनत घेत आहेत. मात्र दहावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नेण्या-आणण्यासाठी आलेल्या पालकांची झुंबड उडत असल्याने प्रशासनही हतबल होत आहे.

कोरोना व्हायरसचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी बीड जिल्ह्यात प्रभावी उपाययोजना केली जात आहे. हा आजार टाळण्यासाठी गर्दी न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एकीकडे हे आवाहन केलं जात असताना परीक्षा केंद्राबाहेर पालकांची गर्दी होतेय. केंद्राच्या परिसरातील हॉटेल , सार्वजनिक ठिकाणी हे पालक एकत्र येत असल्याने तिथेही गर्दी होत आहे. एकीकडे जिल्ह्यातील मॉल, सिनेमा हॉल, जलतरण काही रेस्टॉरंट बंद करण्यात आलेत. जिल्ह्यातील सर्वच आठवडी बाजार रद्द केले आहेत आणि धार्मिक स्थळी प्रवेश बंदी करण्यात आली आहे. काम नसेल तर घरा बाहेर पडू नका असे सांगितले जात आहे. मात्र बुधवारी दहावीच्या परीक्षेसाठी पाल्यासोबत येणाऱ्या पालकांमुळे गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे. ही गर्दी आरोग्य विभागासाठी चिंतेचा विषय बनली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या