मुंबईच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टर्सच्या टास्क फोर्स नेमा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

892

मुंबईच्या धर्तीवर राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात तज्ञ डॉक्टर्सच्या टास्क फोर्स नेमा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगर पालिका आयुक्त यांच्याकडून कोरोना परिस्थितीचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपेदेखील सहभागी झाले होते. कोरोनाशी आपण तीन  महिन्यांपासून लढतो आहोत. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आपण चांगल्या पद्धतीने रोखला असला तरी मृत्यू दर वाढणे बरोबर नाही. आपण लॉकडाऊन शिथिल केला आहे त्यामुळे रुग्णांच्या संख्येत काही जिल्ह्यांत वाढ होत आहे. रुग्ण  शोधणे  आणि त्यांचे  जास्तीत जास्त संपर्क जलदरित्या शोधणे हा एकमेव मार्ग आहे, या कामांत अजिबात ढिलाई नको असे मुख्यमंत्री म्हणाले.

अहवाल त्वरित मिळावेत
प्रयोगशाळांमधून चाचणीचे अहवाल आता लगेच मिळायला पाहिजेत अशा सूचना असताना काही ठिकाणी 72 तास लागत असतील तर ती गंभीर बाब आहे असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

लॉकडाऊन काळात शिवभोजन थाळीचा मोठा आधार
राज्यात लॉकडाऊनच्या काळात शिवभोजन थाळीने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना, स्थलांतरीत मजूर आणि कामगारांना मोठा आधार दिला अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज गौरवोद्गार काढले.  राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करण्यासाठी राज्यात 26 जानेवारीपासून ‘शिवभोजन’ योजना सुरू झाली आतापर्यंत शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत 88 लाख 48 हजार 601 थाळ्यांची विक्री झाली आहे. राज्यात शिवभोजन योजनेअंतर्गत 848 केंद्रे सुरू आहेत. लॉकडाऊनकाळात थाळीची किंमत प्रति थाळीची किंमत पाच रुपये केली आहे. त्यामुळे असंख्य नागरिकांना याचा फायदा झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या