
देशात गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या कोरोनामुळे पायाभूत सुविधांनादेखील त्याचा फटका बसला आहे. देशभरातील 401 प्रकल्पांना याचा फटका बसला आहे. यात प्रत्येक प्रत्येक प्रकल्पांची किंमत 150 कोटींनी किंवा त्याहून अधिकचे प्रकल्प आहेत. कोरोनामुळे प्रकल्पांना लागणारा हा विलंब लक्षात घेता प्रकल्पांची एकूण किंमत ही 4.02 लाख कोटींनी वाढल्याची माहिती केंद्र सरकारने जाहीर केले आहे.
केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि प्रकल्प अंमलबजावणी मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. मंत्रालयातर्पै देशभरातील 150 कोटी हून अधिक किमतीच्या प्रकल्पाचे निरिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी वरील माहिती जाहीर केली आहे. यात त्यांनी 1 हजार 692 प्रकल्पाचे निरीक्षण केले असून त्यातील 401 प्रकल्पांची किंमत वाढली आहे. तर इतर 552 प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अधिकचा वेळ लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
देशभरात सुरु असलेल्या या 1 हजार 692 प्रकल्पांची किंमत 20 लाख 75 हजार 212.70 कोटी इतकी आहे. आता कोरोनामुळे ही रक्कम वाढवून या प्रकल्पांचा किंमत सुमारे 24 लाख 78 हजार 016. 45 कोटी इतकी होणार असल्याचे यावेळी समोर आले आहे. ज्यात सुमारे 4 लाख 02 हजार 803.75 कोटींनी वाढल्याचे दिसून आले आहे. जानेवारी 2020 च्या अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार आतापर्यंत या प्रकल्पावर 44 टक्के म्हणजेच 10 लाख 97 हजार 604.64 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे.
552 प्रकल्पांना लागणार लेटमार्क
दरम्यान, या अहवालानुसार देशांतर्गत सुरु असलेल्या हजारो प्रकल्पांमध्ये सध्या कोरोनाचा चांगलाच फटका बसला आहे. अनेक प्रकल्पांची किंमत वाढली असताना सुमारे 552 प्रकल्यांना पूर्ण होण्यास उशीर होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ज्यात 168 प्रकल्पांना 1 ते 12 महिन्यांचा उशीर होऊ शकतो. तर 125 प्रकल्पांना 13 ते 24 महिन्यांचा उशीर लागणार आहे. तर 25 ते 60 महिन्यांचा लेटमार्क लागणाऱया प्रकल्पांची संख्या ही 145 च्या घरात असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.























































